भोजगाव येथील विहिरीत टाकले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:11 AM2019-07-19T00:11:27+5:302019-07-19T00:14:05+5:30
तालुक्यातील भोजगाव येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत अज्ञात व्यक्तीने बुधवारी रात्री एक लिटर विषारी औषध टाकल्याने हे पाणी दूषित झाले आहे.
गेवराई : तालुक्यातील भोजगाव येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत अज्ञात व्यक्तीने बुधवारी रात्री एक लिटर विषारी औषध टाकल्याने हे पाणी दूषित झाले आहे. औषध टाकल्याचे शेतक-याला लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टाळली. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रि या सुरू होती.
रावसाहेब शिंदे यांचे गावालगत शेत असून, शेतात विहीर आहे. याच विहिरीचे पाणी खाजगी टँकरने गावात व देवपिंपरी, भाटआंतरवाली, कोमलवाडी, राजपिंपरी या ठिकाणी दिले जाते. गुरुवारी सकाळी शेतकरी विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेले असता विहिरीत विषारी द्रव्याचा वास आल्याने ते पाणी तपासून पाहिले. यात विषारी द्रव्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले व तातडीने याची माहिती गेवराई पोलीस ठाण्यात देण्यात आली. यावरून सकाळी गेवराई ठाण्याचे पोलीस सतीश खरात व परमेश्वर तागड यांनी घटनास्थळी भेट देवून विहिरीची पाहणी करून पंचनामा केला. तसेच पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे, नारायण खटाने यांनी घटनास्थळी भेट देऊन विहिरीची पाहणी केली. या पाण्यात टाकलेल्या विषारी द्रव्याच्या दोन बाटल्या जप्त करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी आणले आहेत.
या विहिरीवरून गावात तसेच देवपिंपरी, भाटआंतरवाली, कोमलवाडी, राजपिंपरी या गावात टँकरने पाणी नेले जाते. मात्र, गुरूवारी सकाळी टँकरवाला आला नसल्याने हे पाणी बाहेर गेले नाही. नाहीतर हे पाणी प्राशन केले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. या प्रकरणी शेतकरी रावसाहेब शिंदे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रि या सुरू होती.