जमिनीसाठी स्वत:च्या पत्नीला विष पाजून मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:21 AM2019-07-12T00:21:08+5:302019-07-12T00:21:45+5:30
वारंवार सांगूनही जमीन नावे करण्यास नकार देणाऱ्या पत्नीला विष पाजून मारल्याची घटना धारुर तालुक्यातील कासारी येथे गुरुवारी दुपारी घडली.
दिंद्रूड : मुलांच्या नावे असलेली जमीन माझ्या नावे कर म्हणत नेहमी पत्नीचा छळ केला. वारंवार सांगूनही जमीन नावे करण्यास नकार देणाऱ्या पत्नीला विष पाजून मारल्याची घटना धारुर तालुक्यातील कासारी येथे गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी दिंद्रुड पोलीसात मयत महिलेच्या पतीसह दिरावर खुनाचा गुन्हा दाखल झाला.
राहीबाई बालासाहेब बडे (वय ३५, रा. कासारी, ता. धारुर) असे मयत महिलेचे नाव आहे. पती बालासाहेब बडे, मुलगा दत्ता बडे (१६), मुलगी लक्ष्मी बडे (१२) असा त्यांचा परिवार होता. कासारी परिसरातील दत्ताच्या नावावरील अडीच एकर जमीन माझ्या नावे कर असे म्हणत बालासाहेब राहीबाईकडे तगादा लावत होता. मात्र राहीबार्इंचा स्पष्ट नकार होता. हा राग मनामध्ये ठेवून ११ जुलैला दुपारी राहत्या घरात बालासाहेब व भाऊ व्यंकटी बडे यांनी राहीबाईला विष पाजले. त्यांना उपचारासाठी नागरिकांनी स्वाराती रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची फिर्याद दिंदू्रड ठाण्यात मयत महिलेचा भाऊ बिभीषण तिडके यांनी दिली. याप्रकरणी बालासाहेब व्यकंटी बडे, शाहू उर्फ बबन व्यंकटी बडे (रा.भोगलवाडी) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.