उपवासाच्या भगरीतून विषबाधा; गर्भवती महिलेसह १६ लोकांना मळमळ, उलटीचा त्रास
By सोमनाथ खताळ | Updated: September 26, 2022 18:38 IST2022-09-26T18:37:51+5:302022-09-26T18:38:43+5:30
नवरात्रौत्सवात सोमवारपासून सुरूवात झाली आहे. घटस्थापनेच्या दिवशी अनेकजण उपवास पकडतात.

उपवासाच्या भगरीतून विषबाधा; गर्भवती महिलेसह १६ लोकांना मळमळ, उलटीचा त्रास
बीड : भगरीतून विषबाधा झाल्याने १६ लोकांना मळमळ, उलटी, पोटदुखी, चक्कर असा त्रास झाला. या लोकांवर बीड, ढेकणमोहा येथील खाजगी रूग्णालयांसह नाळवंडी आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. यात एका गर्भवतीचाही समावेश आहे. ही घटना आज दुपारी बीड तालुक्यातील जुजगव्हाण व लक्ष्मीआई तांड्यावर घडली.
नवरात्रौत्सवात सोमवारपासून सुरूवात झाली आहे. घटस्थापनेच्या दिवशी अनेकजण उपवास पकडतात. त्याच अनुषंगाने लक्ष्मीआई तांडा व जुजगव्हाण येथील नागरिकांनी एका दुकानावरून भगरीचे पिठ आणले. ते खाल्याने दुपारनंतर जवळपास १६ लोकांना मळमळ, उलटी, जुलाब, चक्कर येणे, थरथर होणे, पोटदुखी असा त्रास होण्यास सुरूवात झाली. काही लाेकांनी बीड तर काहींनी ढेकणमोहा येथील खाजगी रूग्णालये गाठले. सात लाेकांनी नाळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रज्ञा तरकसे व डॉ.सोनाली सानप यांनी या सर्वांवर उपचार केले. परंतू एक महिला गर्भवती असल्याने आणि दुसऱ्याला सलाईन लावल्यानंतर थंडी जाणवत असल्याने बीड जिल्हा रूग्णालयात रेफर केले. सध्या सर्वांची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, विषबाधेची माहिती समजताच नाळवंडीचे आरोग्य पथक गावात गेले. घरोघरी जावून सर्वेक्षण सुरू केले. तसेच ज्या दुकानातून भगर घेतली, त्याचा नमुनाही तपासणीसाठी घेतल्याचे डॉ.तरकसे यांनी सांगितले.