दरोडा टाकून पसार होणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:27 AM2019-01-07T00:27:36+5:302019-01-07T00:27:44+5:30
दरोडा टाकून जीपमधून पसार होणा-या चार दरोडेखोरांच्या केज पोलिसांनी पाठलाग करून साळेगावजवळ मुसक्या आवळल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : दरोडा टाकून जीपमधून पसार होणा-या चार दरोडेखोरांच्या केज पोलिसांनी पाठलाग करून साळेगावजवळ मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातील जीपसह मोटारसायकल, १६ मोबाईल, नगदी २७ हजार ८९० रुपयांसह दरोडा टाकण्यासाठी वापरलेली कटावणी, तांबी चाकू, स्लॅगर हे साहित्य जप्त केले आहे.
अक्षय भानुदास जाधव (औरंगाबाद), संतोष ओंकार गायकवाड (रा. तलवाडा), दीपक बबन गायकवाड (माजलगाव), बबन मोतीराम गायकवाड (रा. लवूळ, माजलगाव) अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. माजलगाव येथून गढीमार्गे अंबड येथून चोरलेल्या जीपमधून निघालेल्या चार दरोडेखोरांनी ठिकठिकाणी दरोडे टाकले. मांजरसुंबामार्गे नेकनूर येथे ही पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी चाललेल्या काही महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून केजकडे जीपमधून पलायन केले. या बाबत माहिती मिळताच केज पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र, दरोडेखोरांनी पोलिसांना हुलकावणी देत जीप केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कळंबकडे वळवली. केजपासून पाच किलोमीटर अंतर गेल्यावर त्यांनी जीप तेथेच सोडून व्यायामासाठी आलेल्या एकाची मोटारसायकल घेऊन माजलगावकडे मोर्चा वळविला. याचवेळी केजकडे येताना चारही दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई केज ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस नाईक अशोक नामदास, श्रीराम चेवले, अशोक गवळी, जिवन करवंदे, गायकवाड, शिंदे यांनी केली.
सदरील दरोडेखोरांनी गेवराई व नेकनूर पोलीस ठाणेहद्दीत गुन्हे केल्याने केज पोलिसांनी त्यांना नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.