विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:19 AM2021-03-29T04:19:54+5:302021-03-29T04:19:54+5:30
बीड : दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असताना काही नागरिक शहरात दुचाकीवरून फिरत आहेत. गेले दोन दिवस ...
बीड : दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असताना काही नागरिक शहरात दुचाकीवरून फिरत आहेत. गेले दोन दिवस पोलिसांनी या नागरिकांना विचारपूस करून सोडून दिले. मात्र पोलीस मारहाण करत नसल्याचे पाहून मोकाट फिरणाऱ्यांची संख्या वाढत होती. त्यामुळे रविवारी सकाळी शहरातील अनेक भागांत विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून चोप देण्यात आला. बीड शहरातील खासबाग, शिवाजी चौक आणि बशीरगंजमध्ये विनाकाम फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी १० दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. या काळात पोलिसांनी संयमाची भूमिका घेण्याचा सल्लादेखील जिल्हाधिकारी जगताप यांनी दिला होता. मात्र, पोलिसांचा धाक नसल्याचे चित्र तयार झाले होते, त्यामुळे मोकाट फिरणाऱ्यांची संख्या वाढत होती. याला आळा घालण्यासाठी फिरस्त्यांना पोलिसांनी चोप दिला. यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत होता. तर, होळीचा सण असल्यामुळे काही ठिकाणी रंग खेळणाऱ्यांना पोलिसांनी समजावून सांगितले.
धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष आहे. त्यामुळे दारूविक्री करताना कोणी सापडले तर, संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे संकेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. नागरिकांनीदेखील कोरोना संसर्ग वाढत असताना रंग खेळण्याचा मोह टाळावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे. जेणेकरून लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथील करण्याचा प्रशासन विचार करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ओल्या पार्ट्यांवर लक्ष
धुलिवंदनाच्या दिवशी जिल्हाभरात ओल्या पार्ट्या करण्याची परंपरा आहे. त्यामध्ये अनेकजण एकत्र येतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या ओल्या पार्ट्यांवरदेखील पोलिसांचे लक्ष असून, ठिकठिकाणी गस्ती वाढविण्यात आल्या आहेत.
===Photopath===
280321\282_bed_10_28032021_14.jpg
===Caption===
बशिरगंज भागात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी चोप दिला.