जमिनीच्या वादाच्या चौकशीसाठी बोलावून पोलिसांची मारहाण - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:32 AM2021-04-18T04:32:40+5:302021-04-18T04:32:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडा : तुझ्या चुलत बहिणीने जमिनीच्या वादाची अंभोरा पोलिसात तक्रार दिली आहे, असे सांगत मला चौकशीसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : तुझ्या चुलत बहिणीने जमिनीच्या वादाची अंभोरा पोलिसात तक्रार दिली आहे, असे सांगत मला चौकशीसाठी बोलावून पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे व इतर तीन जणांनी मारहाण केली. माझी कसलीही तक्रार न घेता आपल्याला ठाण्यातून हाकलून दिल्याची तक्रार गणेश सूर्यभान चाटे यांनी उपविभागीय अधिकारी विजय लगारे यांच्याकडे केली आहे.
याविषयी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १५ रोजी अंभोरा पोलिसांनी सकाळी नऊ वाजता तुझ्या बहिणीने तक्रार केली असून, जमिनीच्या वादातून आमच्या ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल केली आहे. त्यामुळे मी आणि माझे काका पोलीस ठाण्यात गेलो. पण तेथे आमच्या बीटचे जमादार काकडे तेथे नसल्याने आम्ही तिथे १ वाजेपर्यंत थांबलो. पण तिथे देवडे नामक पोलीस हवालदार यांनी मला अर्वाच्च भाषेत शिव्या देण्यास सुरूवात केली. देवडे यांनी मला दोन कानशिलात मारले. त्यानंतर माझे काका मध्ये आले असता, त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर देवडे यांनी माझ्या खिशातले पाच हजार रूपये काढून घेतले व पंधरा हजार रूपये आणून दे, म्हणत हाकलून दिले. त्यानंतर मी आष्टी ग्रामीण रुग्णालयात गेलो असता, माझ्या कानाला मार लागला असून, मला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठवले आहे. मला मारहाण केलेल्या पोलिसांची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गणेश चाटे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे.