बीडमध्ये नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या घरी जाणार पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:02 AM2018-08-23T01:02:14+5:302018-08-23T01:02:36+5:30
मोटार वाहतूक नियमांचा भंग करणाºया वाहन चालकांवर पोलिसांची नजर असून सीसीटीव्हीच्या फुटेजचा आधार घेऊन कारवाईसाठी पोलीस संबंधित वाहन चालकांच्या घरापर्यंत पोहोचणार आहेत. १५ आॅगस्टपासून सुरु केलेल्या या कारवाईत चार दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
बीड : मोटार वाहतूक नियमांचा भंग करणाºया वाहन चालकांवर पोलिसांची नजर असून सीसीटीव्हीच्या फुटेजचा आधार घेऊन कारवाईसाठी पोलीस संबंधित वाहन चालकांच्या घरापर्यंत पोहोचणार आहेत. १५ आॅगस्टपासून सुरु केलेल्या या कारवाईत चार दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शहरात नगर पालिकेद्वारे ६० सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक चौकात व महत्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेले आहेत. या कॅमेºयांचे कंट्रोल पॅनल हे पोलीस नियंत्रण कक्षात बसविण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी कारवाईच्या सूचना करण्यात आल्या. नियंत्रण कक्षामध्ये असलेल्या ६० कॅमेºयांचे वाहतूक कर्मचारी पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज पाहून नियमबाह्य वाहन चालविणाºया वाहन चालकांविरुद्ध प्रत्यक्ष कारवाईचे काम १५ आॅगस्टपासून सुरू करण्यात आले.
वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाºया चार दुचाकी चालकांचा त्यांच्या घरापर्यंत शोध घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांना प्रत्येकी २०० रूपये दंड याप्रमाणे एकूण ८०० रूपये दंड वसूल केला.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बुधवंत व वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी ही कारवाई केली. अशा प्रकारची कारवाई यापुढेही चालू राहणार आहे. वाहन चालकांनी शहरात नियमांचे पालन करून वाहन चालवावे, उल्लंघन न करता शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी सहकार्य करावे असे जिल्हा वाहतूक पोलीस विभागाने कळविले आहे.
असा घेणार शोध, अशी होणार कारवाई
पोलीस नियंत्रण कक्षातील कंट्रोल पॅनलवर वाहन चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसणार आहे. ट्रिपल सीट, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, रॉँग साईडने वाहन चालविणे व इतर प्रकारे नियमभंग होताना दिसल्यास सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात येईल.
त्यांच्या वाहनांचे नंबर पाहून वाहनाचे रजिस्ट्रेशन तपशीलावरून संबंधित चालकाचा पत्ता शोधून त्याच्या घरी जाऊन ही कारवाई करण्यात येणार आहे.
बंदोबस्ताला ड्रोन कॅमेरा
एकीकडे वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी उपाय सुरू असताना दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सण- उत्सवांच्या काळात मिरवणूक व जिल्हा पोलीस दल बंदोबस्तामध्ये ड्रोन कॅमेरे वापरणार आहे. यामुळे नियंत्रण करणे सुलभ होणार आहे.