बीडमध्ये ११४८ नागरिकांमागे एक पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:17 PM2018-04-26T23:17:01+5:302018-04-26T23:17:01+5:30

बीड जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत बीड जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरीच आहे.

A police behind 1148 people in Beed | बीडमध्ये ११४८ नागरिकांमागे एक पोलीस

बीडमध्ये ११४८ नागरिकांमागे एक पोलीस

Next
ठळक मुद्दे२५ लाख जनतेची सुरक्षा केवळ २२५० पोलिसांवर

बीड : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली की पोलिसांचे दुर्लक्ष, पोलिसांचा हलगर्जीपणा, पोलीस निकामी, असे विविध आरोप पोलिसांवर केले जातात. परंतु वास्तव परिस्थितीचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत बीड जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरीच आहे. असे असतानाही कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दल धडपडत असते. यामध्ये त्यांना काही प्रमाणात यशही येते. परंतु आपण जबाबदार नागरिक म्हणून पोलीस प्रशासनावरच सुरक्षेसाठी सर्वस्वी अवलंबून न राहता स्वत:च सतर्क राहण्याची गरज आहे. २०११ च्या लोकसंख्येप्रमाणे ११४८ नागरिकांमागे एक पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी आहे. हा आकडा अतिशय किरकोळ आहे. त्यामुळेच सुरक्षेसाठी बीड पोलिसांना कसरत करावी लागत असल्याचे समोर आले आहे.

२०११ जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या २५ लाख ८४ हजार एवढी आहे. यामध्ये १३ लाख ४९ हजार पुरुष, तर १२ लाख ३५ हजार महिला आहेत. यांच्या सुरक्षेची जबाबदारी बीड जिल्हा पोलीस दलावर आहे. २५ लाख नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस दलाकडे २२५० अधिकारी व कर्मचारी आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा अतिशय तोकडा आहे. त्यामुळेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारी टाळण्यासाठी जिल्हा पोलीस दलाला कसरत करावी लागत आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात लूटमार, चोे-या, दरोडे, खून, छेडछाड यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून अनेक वेळा वेळ लागतो. पोलीस आरोपींना अटक करीत नाहीत, त्यांना पाठिशी घालतात, चोºयांचे तपास लागत नाहीत याला पोलीसच जबाबदार आहेत असे अनेक आरोप नागरिकांमधून पोलिसांवर होताना ऐकावयास मिळतात. परंतु वाढते गुन्हे व लोकसंख्येच्या तुलनेत तपास करताना पोलिसांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगण्यात आले.

दामिनी पथकाकडे दुसरीच कामे
महिला व मुलींवर होणाºया अत्याचार, अन्यायाच्या घटना टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यात १२ दामिनी पथकांची नियुक्ती केली. परंतु या पथकाकडे दुसरीच कामे लावली जातात. तपास, बंदोबस्त व इतर कारणांमुळे त्यांना महिला व मुलींशी संवाद साधून त्यांच्यात विश्वास निर्माण करताना अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी सध्या कारवायांच्या आकडेवारीवरुन ही पथके यशस्वी ठरल्याचे दिसते.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न बनला गंभीर
पोलिसांकडे ३६७५ महिलांमागे केवळ एक महिला पोलीस कर्मचारी आहे. हा आकडा सुरक्षिततेच्या दृष्टीने खूपच कमी आहे. त्यामुळेच महिला, मुलींची छेड काढणे, त्यांच्यावर अत्याचार होणे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. परंतु हे टाळण्यासाठी आता महिलांनीही पुढाकार घेत पोलिसांना मदत करण्याची गरज आहे. पोलिसांनीही त्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.

गुन्हे अनेक, तपास अधिकारी एकच
जिल्ह्यात रोज छोट्यामोठ्या अशा किमान ४० ते ५० गुन्ह्यांची नोंद पोलीस डायरीला असते. याचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असते. गुन्ह्यांची व पोलीस दलाची संख्या डोळ्यासमोर ठेवली असता एका अधिकारी व कर्मचाºयाकडे १० ते १५ गुन्हे तपासावर असतात. त्यामुळे त्यांना तपास करताना वेळ मिळत नाही. शिवाय, कार्यालयीन कामकाजाशिवाय बंदोबस्त व इतर कामांचाही ताण असतो, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. एका पोलिसाकडे तपासासाठी एकच गुन्हा असावा त्यामुळे त्यात सत्यता व दर्जा राहील असे खुद्द विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात वक्तव्य केले होते.

पोलीस जनतेच्या सेवेसाठी सतत प्रयत्नशील
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दल सतत प्रयत्न करते. त्यात आम्हाला यशही येते. नुकतीच पोलीस भरती झाली असून, नव्याने काही कर्मचारी रुजू होतील. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करतो. शिवाय, त्यांच्याशी संवादही साधतो. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे. पोलीस जनतेच्या सेवेसाठी सतत प्रयत्नशील राहतील.
- वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, बीड

Web Title: A police behind 1148 people in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.