उस दराबाबत माजलगावच्या आमदारांच्या घरावर निघालेला शेतक-यांचा मोर्चा पोलीसांनी अडवला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 05:37 PM2017-12-08T17:37:10+5:302017-12-08T17:40:51+5:30
तालुक्यातील उसउत्पादक शेतक-यांचे उस दराबाबत मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून तालुक्याचे आमदार आर. टी. देशमुख यांच्या घरावर आज मोर्चा काढण्यात आला.
माजलगाव (बीड) : तालुक्यातील उसउत्पादक शेतक-यांचे उस दराबाबत मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून तालुक्याचे आमदार आर. टी. देशमुख यांच्या घरावर आज मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा आमदारांच्या निवास स्थानाकडे जात असतानाचा रोखला व आंदोलक शेतक-यांना ताब्यात घेतले.
तालुक्यातील उस उत्पादक शेतक-यांचे मागील काही दिवसांपासून वाढीव उस दराबाबत आंदोलन सुरु आहे. याबाबत मंगळवारी शहरातील बाजारसमिती आवारात सर्व पक्षीय नेते व शेतक-यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी माजलगाव विधानसभेचे आमदार आर. टी. देशमुख यांनी साखर संचालकांना उस दराबाबत चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली. मात्र, आमदार देशमुख याबाबत काहीच भूमिका मांडत नसल्याने शेतक-यांनी त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचे बैठकीत ठरवले. यानुसार आज सकाळी सर्व शेतकरी मोर्चासाठी बाजार समितीच्या आवारात जमले. तेथून ते आमदार निवासस्थानाकडे जात असतानाच त्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवला व आंदोलक शेतक-यांना त्यांनी ताब्यात घेतले. दरम्यान, आमदार देशमुख यांनी साखरसंचालक पुणे यांची भेट घेवून त्यांच्याकडे शेतक-यांचे मागणी मांडली असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.
आमदार दिशाभूल करत आहेत
आमदार देशमुख यांच्याकडुन शेतक.यांच्या प्रश्नाची सोडवणुक होत नसल्यामुळे त्यांना थेट जाब विचारण्यासाठी आम्ही मोर्चा घेवून जात होतो. मात्र, त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करत पोलीस बळाचा वापर करत आम्हाला रोकले असले तरी आम्ही आंदोलन थांबवणार नाही.
- भाई गंगाभिषण थावरे, शेतकरी संघर्ष समिती