बीडमध्ये पोलिसांची पुन्हा मनमानी; ओळखपत्र दाखवूनही डॉक्टरांना अडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 11:51 AM2021-05-22T11:51:29+5:302021-05-22T11:52:22+5:30
अत्यावश्यक सेवेतील अथवा प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र असल्यास अडवू नये, अशा सुचना असतानाही पोलिसांकडून पुन्हा मनमानी सुरू
बीड : सध्या पोलीस विरूद्ध आरोग्य विभाग असे वाद होताना दिसत आहे. कर्तव्यावर जाणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले ओळखपत्र दाखवूनही त्यांना ड्रायव्हींग लायसन दाखवा म्हणून थांबवून ठेवले. हा प्रकार शनिवारी सकाळी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडला. यामुळे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे लॉकडाऊन करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. असे असले तरी अत्यावश्यक सेवेतील अथवा प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र असल्यास अडवू नये, अशा सुचना असतानाही पोलिसांकडून पुन्हा मनमानी सुरू झाली आहे. सकाळी कोवीड सेंटर व जिल्हा रूग्णालयासह कार्यालयात जाणाऱ्या डाॅक्टरांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून अडविण्यात आले. ओळखपत्र दाखविल्यानंतर आपल्याकडचे ड्रायव्हींग लायसन दाखवा म्हणून तासनतास थांबवून ठेवण्यात आले. यामुळे त्यांना कर्तव्यावर जाण्यास उशिर झाला. यामुळे पोलिसांची मनमानी पुन्हा एकदा समोर आली आहे.
पावत्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारवाया
सूत्रांच्या माहितीनुसार एका कर्मचाऱ्याला २५ कारवाया करण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे. हेच उद्दिष्ट पूर्ण करून वरिष्ठांना दाखविण्यासाठी या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप होत आहे. परंतू या निमित्ताने पोलिसांविरोधात रोष तयार होत आहे.