गोदापात्रात पोलिसांची वाळूमाफियांवर मोठी कारवाई; तीन कोटींचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 04:31 PM2022-03-16T16:31:17+5:302022-03-16T16:31:30+5:30
पथकाने चार हायवा, एक ट्रकसह १९ ब्रास वाळू असा एकूण तीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला.
गेवराई (बीड) : तालुक्यातील खामगांव व सावरगावं येथील गोदावरी पात्रातील अवैध वाळू उपस्यावर आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिसांनी जोरदार कारवाई केली. यावेळी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने ३ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना तालुक्यातील खामगांव व सावरगावं गोदावरी नदी पात्रात दररोज हजारो ब्रास वाळूचा अवैधरित्या उपसा होत असल्याची माहिती मिळाली. यावरून कुमावत यांनी आज सकाळी ७ वाजता पथकासह येथे कारवाई केली. यावेळी पथकाने चार हायवा, एक ट्रकसह १९ ब्रास वाळू असा एकूण तीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत पोलिस अधिक्षक कुमावत यांच्यासोबत बालाजी दराडे, सचिन हंकारे, महादेव सातपुते सह गेवराई डीबी पथक प्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळेसह इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या प्रकरणी अद्याप गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.