पोलीस बंदोबस्तात तोडले वीज कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:14 AM2019-09-22T00:14:13+5:302019-09-22T00:14:36+5:30
पेठबीड भागात शनिवारी चक्क शस्त्राधारी पोलीस बंदोबस्तात वीज जोडण्या तोडण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील पेठबीड भागात शनिवारी चक्क शस्त्राधारी पोलीस बंदोबस्तात वीज जोडण्या तोडण्यात आल्या. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महावितरणने बड्या थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. तीन दिवसांत एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या २७६ ग्राहकांच्या घरांची, दुकानाची वीज जोडण्या तोडल्या.
बड्या थकबाकीदारांचे वीज जोडणी तोडण्याच्या कारवाईला महावितरणने गती दिली आहे. पहिल्या टप्यात १ लाखापेक्षा जास्त तर दुसऱ्या ५० हजारपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांविरोधात कारवाया केल्या जाणार आहेत. १८ सप्टेंबरपासून जिल्ह्यात एकाचवेळी ही मोहीम हाती घेतली असून तीन दिवसांत तब्बल २७६ वीज कनेक्शन तोडण्यात आले आहेत.
दरम्यान, बीड शहरातील पेठबीड भागात पहिल्याच दिवशी पथकाला एका ग्राहकाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती. त्यानंतर शनिवारी महावितरणने पोलीस बंदोबस्त घेत थकबाकी असणा-या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले. एकही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले.
अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता कुरेशी, विजय भारंबे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.एल.कांबळे, सहायक अभियंता शिवाजी आहेर, अजय पिठाले, अमोल सोनपरोते, प्रदीप मिसाळ, सचिन हाळबे, शिल्पा जोशी आदींनी या कारवाया केल्या.
महावितरणने कारवाईची मोहीम हाती घेतली. त्यानंतर काहींनी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, महावितरणने माघार घेतली नाही. अखेर हतबल झालेल्या थकबाकीदारांनी महावितरण कार्यालय गाठून पैसे भरले. तीन दिवसांत हा आकडा ११७ वर गेला आहे.