पोलिसांना माणुसकी भोवली; हातकडीसह आरोपीचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:03 AM2019-01-01T00:03:59+5:302019-01-01T00:05:44+5:30
थंडीने डोळे पांढरे केले. कोठडीत त्याचे काही बरे वाईट होऊ नये, म्हणून रात्री एक वाजता अत्याचाराच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपीला बाहेर काढले. याचवेळी पोलिसाला हिसका देत त्याने हातखडीसह पलायन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड/धारूर : थंडीने डोळे पांढरे केले. कोठडीत त्याचे काही बरे वाईट होऊ नये, म्हणून रात्री एक वाजता अत्याचाराच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपीला बाहेर काढले. याचवेळी पोलिसाला हिसका देत त्याने हातखडीसह पलायन केले. त्यानंतर दहा तासांत पुन्हा त्याला गजाआड केले. केवळ माणुसकी पोटी त्याला रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या चांगलाच अंगलट आल्याचे यावरून दिसते.
धनराज डोंगरे (२५ रा.पिंपरवाडा ता.धारूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार केला होता. धारूर ठाण्यात ११ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला. त्याला २९ तारखेला अटक केली. न्यायायालने ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. रविवारी रात्री त्याची प्रकृती खालावल्याने त्याला रूग्णालयात नेले. डॉक्टरांनीही काळजी घेण्याचे सांगितले. कोठडीत त्याला पांघरूनही दिले. मात्र रात्री १ वाजताच्या सुमारास त्याने डोळे पांढरे करायला सुरूवात केली.
पहारेकरी पोना दिगंबर गिरी यांनी त्याला बाहेर काढले. लॉक लावत असतानाच धनराज त्यांना हिसका देत हातखडीसह पलायन केले. गिरी यांनी इतरांना आवाज देण्यापूर्वीच त्याने अंधारातून गायब झाला. रात्रभर धारूर पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळाला नाही. सकाळी तो आसोला येथील नातेवाईकाकडे तो लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे त्याला सापळा लावून सकाळी पुन्हा गजाआड केले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पहारेकऱ्यांची होणार चौकशी
पोना गिरी यांच्या माणुसकीचा धनराजने फायदा घेतला. आता गिरी यांना वरिष्ठांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. धारूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनीही याला दुजोरा दिला आहे.