पोलीस निरीक्षकाने केला हवालदारावरच गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:33 AM2021-02-13T04:33:22+5:302021-02-13T04:33:22+5:30
बीड : जुगार, अवैध दारू व इतर गुन्ह्यात जप्त केलेल्या रोख रकमेसह इतर मुद्देमाल जमा न केल्यामुळे, तसेच गुन्ह्यात ...
बीड : जुगार, अवैध दारू व इतर गुन्ह्यात जप्त केलेल्या रोख रकमेसह इतर मुद्देमाल जमा न केल्यामुळे, तसेच गुन्ह्यात आरोपीला सहाय्य होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक साईनाथ ठोंबरे यांनी पोह.मोहन काकडे यांच्याविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मागील काही महिन्यांपासून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोह. मोहन काकडे हे सतत गैरहजर आहेत. दरम्यान त्यांना वेळोवेळी सूचना देऊन देखील ते कर्तव्यावर हजर झाले नाहीत. तसेच २०१९ मधील काही गुन्ह्याचा तपास काकडे यांच्याकडे होते. त्या गुन्ह्यात जप्त केलेली १० हजार रुपयांची देशी-विदेशी दारू, तसेच ५० हजार रुपयांची दुचाकी व काही रोख रक्कम ठाण्यात जमा केला नाही. तसेच आरोपीला सहाय्य होईल, या दृष्टीने संबधीत गु्ह्याशी संबंधित सर्व कागदपत्रे ठाण्यात जमा केली नाहीत. तसेच तपासी अंमलदार असून देखील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले नाहीत. गुन्हे निर्गतीबाबत वेळोवेळी लेखी व तोंडी आदेश देऊन देखील पोह.काकडे यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच सतत गैरहजर राहिल्यामुळे ठाणप्रमुख पोनि ठोंबरे यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास सपोनि शेख हे करत आहेत.
विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिले होते उद्धिष्ट
काही दिवसांपूर्वी विशेष पोलीस महानिरिक्षक यांनी बीडमध्ये सर्व पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली होती. यामध्ये प्रलंबित गुन्ह्याचा निपटारा करण्याचे उद्धिष्ट त्यांनी सर्वांना दिले होते. यावेळी देखील वेळोवेळी कागदपत्रे मागून न दिल्यामुळे काकडे यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची सूत्रांची माहिती आहे.