गणेशोत्सवासाठी पोलिसांची 'अष्टनियमावली' जारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:40 AM2021-09-10T04:40:57+5:302021-09-10T04:40:57+5:30
बीड : जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी विघ्नहर्त्या गणरायाचा उत्सव काेरोनाच्या सावटाखाली साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. जिल्हा पोलीस ...
बीड : जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी विघ्नहर्त्या गणरायाचा उत्सव काेरोनाच्या सावटाखाली साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. जिल्हा पोलीस दलाने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ९ सप्टेंबर रोजी अष्टनियमावली जारी केली आहे. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा, पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना करा असे निर्बंध लागू केले असून, विसर्जन मिरवणुकीलाही परवानगी दिली जाणार नाही. जिल्ह्यात गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. मोठ्या जल्लोषात हा उत्सव भक्तगण साजरा करीत असतात. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. तिसऱ्या लाटेच्या भीतीने गणेशोत्सव निर्बंधात साजरा करावा लागणार आहे. सार्वजनिक मंडळांना पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून, उत्सवादरम्यान कोठेही गडबड, गोंधळ होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.
....
या आहेत आठ सूचना
१. शासन आदेशाप्रमाणे गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध आहे. दर्शन केवळ ऑनलाईन उपलब्ध राहील.
२ - न्यायालयाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार मर्यादित स्वरूपात मंडप उभारा.
३- सार्वजनिक मंडळासाठी ४ फूट व घरगुती मूर्ती ही २ फूट उंचीच्या मर्यादेत असावी.
४- शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू, संगमरवरी, आदी मूर्तींचे पूजन करावे.
५- मूर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असावी. मूर्ती विसर्जन घरीच करावे.
६- श्री गणेश मंडळाच्या मंडप व डेकोरेशनचा सार्वजनिक वाहतुकीस व पादचारी यांना अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच मंडळाचे संरक्षण / सुरक्षा देखरेख यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सार्वजनिक मंडळांची राहील.
७- श्री गणेश भक्तांनी / मंडळांनी पर्यावरण प्रदूषण (ध्वनी, हवा, पाणी) याबाबतच्या नियमांचे व तरतुदींचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
८- श्रीगणेशाच्या विसर्जनाच्या वेळी मिरवणूक काढण्यास शासनाने प्रतिबंध केला आहे; त्यामुळे गाव /
नगर / कॉलनी/ यांतील गणेशभक्तांनी / मंडळांनी स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार कार्यवाही
करावी; तसेच प्रशासनाला सहकार्य करावे. कोविड संसर्गाचा प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी.
....
आतापर्यंत केवळ ६५ मंडळांनीच घेतली परवानगी
जिल्ह्यात दरवर्षी हजार ते दीड हजार सार्वजनिक गणेश मंडळांकडून 'श्रीं'ची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा ९ सप्टेंबर अखेरपर्यंत केवळ ६५ मंडळांनी सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे यंदा परवानगीसाठी मंडळांमध्ये अनुत्सुकता असल्याचे दिसून येते.
...
कोविडच्या अनुषंगाने सार्वजनिक मंडळांनी तसेच घरी गणपतीची प्रतिष्ठापना करताना नियमांचे काटेकोर पालन करावे. मूर्तीचे पावित्र्य राखण्यासाठी सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी.
विसर्जन मिरवणुकीला परवानगी राहणार नाही. कुठल्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेऊन पोलिसांना सहकार्य करावे.
- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड
......
.....