धक्कादायक! ड्युटीवरून परतणाऱ्या महिला पोलिसाचा सहकाऱ्याकडूनच विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 04:49 PM2019-05-26T16:49:00+5:302019-05-26T16:51:56+5:30
पोलिसांकडून प्रकरण दडपलं जात असल्याचा आरोप
बीड : मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणत ड्यूटी संपवून घरी परतत असताना रस्त्यात अडवून आपल्या सहकारी महिला पोलिसाचाविनयभंग केल्याची घटना बीडमध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिला व आरोपी हे आठ महिन्यांपूर्वी एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत होते, असे समजते.
शेख शौकत शेख मुन्सी (३३) असे आरोपी पोलीस नाईकाचे नाव असून तो मोटार परिवहन विभागात कार्यरत आहे. शौकत व पीडिता हे बीड शहरातीलच एका पोलीस ठाण्यात यापूर्वी कार्यरत होते. साधारण ऑक्टोबर महिन्यात शौकतने पीडितेचा मोबाईल घेऊन त्यातील तिचे सर्व फोटो स्वत:च्या मोबाईलमध्ये घेतले. त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करू लागला. सोशल मीडियावरून जवळीक साधू लागला. हा त्रास वाढल्याने पीडितेने सर्व प्रकार आपल्या पोलीस पतीला सांगितला. त्यानंतर शौकतविरोधात तक्रार दिली. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी यात शौकतचा जबाब घेऊन कारवाई केली. त्यानंतर आपण तिला त्रास देणार नसल्याचे लेखी दिले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शौकतची बदली अंभोरा पोलीस ठाण्यात केली.
दरम्यान, तरीही त्याने पीडितेचा पाठलाग करणे सोडले नाही. १६ मे रोजी रात्री ८ वाजता ड्यूटी संपवून पीडिता दुचाकीवरून घरी जात होती. याचवेळी जिल्हा रूग्णालयाच्या पाठीमागील संगम हॉलजवळ शौकतने पीडितेची दुचाकी अडविली. तिला दुचाकीवरून खाली ओढत ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे म्हणत लगट करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि आरडाओरडा केला. तोपर्यंत शौकतने तेथून पळ काढला होता.
हे प्रकरण पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे ही तक्रार केली. त्यांनी विशाखा समितीपुढे हे प्रकरण मांडले. चौकशी करून २५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास या प्रकरणात बीड शहर ठाण्यात शौकतविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
शहर पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा गुन्हा दाखल झाला. माध्यमांनी याबाबत शहर पोलिसांशी वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच रविवारीही पीएसओंनी माहती लपविण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारावरून शहर पोलीस आरोपीला पाठिशी घालत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रविवारी उशिरापर्यंत आरोपीला पोलिसांनी अटक केली नव्हती. त्यामुळे शहर पोलीस संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
आरोपी पोलीस तीन लेकरांचा बाप
शेख शौकत याची पत्नी शिक्षिका असल्याचे सांगण्यात आले. त्याला तीन अपत्य आहेत. तर पीडितेचा पतीही पोलीस असून तो सुद्धा बीडमधीलच एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
बीडमधील पोलिसांचा वचक संपतोय
बीड शहरात आता रक्षकांकडूनच सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसते. तर काही ठाणे प्रभारी केवळ वरिष्ठांपुढे रूबाब गाजवत असल्याचे दिसते. प्रत्यक्षात मात्र चोरी, लुटमारीचे तपास रखडलेले आहेत. अपुरे मनुष्यबळ असल्याचे एकीकडे सांगितले जाते, तर दुसऱ्या बाजूला उपअधीक्षक, अधीक्षकांसारखे काही अधिकारी सुरक्षा रक्षक घेऊन चमकोगिरी करत असल्याचे बोलले जाते.