एक कोटीची लाच मागणाऱ्या हरिभाऊ खाडेविरोधात तक्रार देणाऱ्यालाच पोलिसांची नोटीस

By सोमनाथ खताळ | Published: June 1, 2024 04:03 PM2024-06-01T16:03:23+5:302024-06-01T16:05:20+5:30

चुकीच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

Police notice to those who filed a complaint against Haribhau Khade who demanded a bribe of one crore | एक कोटीची लाच मागणाऱ्या हरिभाऊ खाडेविरोधात तक्रार देणाऱ्यालाच पोलिसांची नोटीस

एक कोटीची लाच मागणाऱ्या हरिभाऊ खाडेविरोधात तक्रार देणाऱ्यालाच पोलिसांची नोटीस

बीड : आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्याविरोधात एसीबीकडे तक्रार देणाऱ्याला शिवाजीनगर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या तक्रारदारावर आतापर्यंत एकही गुन्हा नाही किंवा आतापर्यंत एकदाही नोटीस नाही. असे असतानाही मतमोजणीच्या नावाखाली नोटीस देऊन आपल्याला चुकीच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

जिजाऊ मल्टिस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी हरिभाऊ खाडे याने १ कोटी रुपयांची लाच मागितली होती. याची एसीबीकडे तक्रार देताच त्यांनी एका खासगी इसमाला पाच लाख घेताना पकडले, तसेच खाडेसह सहायक फौजदार आर.बी. जाधवर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. कारवाईचे धाडस दाखविल्याने जिजाऊच्या ठेवीदारांनी या तक्रारदाराचा सत्कारही केला होता; परंतु पोलिस अधिकाऱ्याविरोधात तक्रार दिल्याचा राग मनात धरून शिवाजीनगर पोलिसांनी आपल्याला विनाकारण नोटीस बजावल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या एकाही निवडणुकीत तक्रारदाराला नोटीस नाही. त्यांच्यावर कसलाही गुन्हा नाही. असे असतानाही शिवाजीनगर पोलिसांनी मतमोजणीच्या अनुषंगाने आताच का नोटीस बजावली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या नोटीसमुळे शिवाजीनगर पोलिस अडचणीत येण्याची शक्यता आहे, तसेच जिजाऊचे ठेवीदारही आक्रमक झाले असून, नोटीसविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

मला अडकवण्याचा प्रयत्न
माझ्याविरोधात आतापर्यंत कोणाचीही तक्रार किंवा गुन्हा दाखल नाही. मी कोणत्या राजकीय पक्ष किंवा संघटनेतही नाही. तरीही पोलिसांनी नोटीस दिली आहे. मी ती घेण्यास नकार दिला आहे. हरिभाऊ खाडेविरोधात तक्रार दिल्याने पोलिस मला अशा नाेटीस देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या तयारीत आहेत. नावाचा गैरवापर करायला लावूनही माझ्यावर कारवाई होऊ शकते. मी याविरोधात पोलिसांना लेखी देणार आहे, असे खाडे यांच्याविरोधातील तक्रारदाराने सांगितले.

तक्रार नसतानाही नोटीस
हरिभाऊ खाडे यांच्याविरोधात तक्रार दिल्यानेच संबंधिताला नोटीस बजावली आहे. राजकीय पक्ष, संघटनेत नसतानाही आतापर्यंत गुन्हा तर सोडाच; पण तक्रार नसतानाही पोलिसांनी नोटीस कशी काय बजावली? ठेवीदार म्हणून याविरोधात आवाज उठवणार आहे.
- अशोक हिंगे, ठेवीदार कृती समिती

चौकशी करावी लागेल
मतमाेजणीच्या अनुषंगाने अनेकांना नोटीस दिल्या आहेत. संबंधिताला ही नाेटीस का दिली, याची चौकशी मला करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला कळवतो.
- मारुती खेडकर, पाेलिस निरीक्षक, शिवाजीनगर बीड

Web Title: Police notice to those who filed a complaint against Haribhau Khade who demanded a bribe of one crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.