कडक IPS अधिकाऱ्याच्या नावाचा गैरफायदा; वाळू माफियांकडून वसुली करणारा अंमलदार निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 12:44 PM2022-08-11T12:44:26+5:302022-08-11T12:47:06+5:30

राजकीय पक्षांच्या आश्रयाला असलेल्या पदाधिकाऱ्यांसह अवैध धंदेवाले व माफियांविरुद्ध धडक कारवाया केल्याने पंकज कुमावतांच्या नावाची दहशत आहे. याचाच फायदा घेत अंमलदार धोंडीराम मोरे यांनी परस्पर वसुलीचा फंडा वापरला.

Police officer who recovered from sand transporters suspended; IPS officers show fear | कडक IPS अधिकाऱ्याच्या नावाचा गैरफायदा; वाळू माफियांकडून वसुली करणारा अंमलदार निलंबित

कडक IPS अधिकाऱ्याच्या नावाचा गैरफायदा; वाळू माफियांकडून वसुली करणारा अंमलदार निलंबित

Next

बीड : वरिष्ठांच्या परवानगीशिवाय वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची परस्पर रॉयल्टी तपासून वसुली करणाऱ्या अंमलदारास ९ ऑगस्ट रोजी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. त्याच्या कारनाम्याचा खुद्द पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनीच पर्दाफाश केला. दरम्यान, या कारवाईने हप्तेखाेरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

धोंडीराम मोरे असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ते माजलगाव ग्रामीण ठाण्यात कार्यरत असून तेथील उपअधीक्षक कार्यालयात संलग्न आहेत. उपअधीक्षक पद रिक्त असल्याने सध्या अतिरिक्त पदभार केजचे सहायक अधीक्षक व आयपीएस पंकज कुमावत यांच्याकडे आहे. अवैध धंद्यांवर कारवाईसाठी कुमावतांनी नेमलेल्या पथकासाठीही मोरे काम करत. याचा फायदा घेत ते माजलगाव ग्रामीण ठाणे हद्दीत वाळू वाहनांची परस्पर तपासणी करत. रॉयल्टी तपासणीच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार करत, अशा स्वरूपाच्या तक्रारी अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना प्राप्त झाल्या होत्या. 

दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी खुद्द अधीक्षकांनीच खातरजमा करण्यासाठी अंमलदार धोंडीराम मोरे यांना मोबाइलवरून वाळू वाहनांची तपासणी सुरू आहे का, असे विचारले. त्यावर मोरे यांनी हो म्हटले. मात्र, याबाबत कोणाचे आदेश आहेत, पंकज कुमावत यांनी सांगितले होते का, अशी विचारणा केल्यानंतर मोरे गडबडले. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या उद्देशाने परस्पर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची रॉयल्टी तपासणी करून गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवून अधीक्षक ठाकूर यांनी त्यांना निलंबित केले.

कुमावत यांच्या दहशतीचा असाही गैरफायदा....
राजकीय पक्षांच्या आश्रयाला असलेल्या पदाधिकाऱ्यांसह अवैध धंदेवाले व माफियांविरुद्ध धडक कारवाया केल्याने पंकज कुमावतांच्या नावाची दहशत आहे. याचाच फायदा घेत अंमलदार धोंडीराम मोरे यांनी परस्पर वसुलीचा फंडा वापरला. कुमावत यांच्या नावाखाली अवैध धंदेवाल्यांशी हितसंबंध ठेवणारे यामुळे रडारवर आले आहेत.

वरिष्ठांच्या आदेशाशिवाय करत होता तपासणी
संबंधित अंमलदार पंकज कुमावत यांच्या पथकात असल्याचे सांगून वरिष्ठांच्या आदेशाशिवाय वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची रॉयल्टी तपासत असल्याची माहिती होती. उलटतपासणी म्हणून मीच त्यास कॉल करून माहिती घेतली तेव्हा तो परस्पर तपासणी करत असल्याचे आढळले. त्यामुळे त्यास निलंबित केले.
- नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड
 

Web Title: Police officer who recovered from sand transporters suspended; IPS officers show fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.