बीड जिल्ह्यात दिंद्रूडमध्ये होणार पोलीस पेट्रोल पंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 07:02 PM2018-12-13T19:02:42+5:302018-12-13T19:05:59+5:30
याबरोबरच दिंद्रूड आणि वडवणी येथील प्रस्तावाचा देखील समावेश होता.
बीड : जिल्हा पोलीस दलाचा आणखी एक पेट्रोल पंप माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथे होत आहे. याला मंजुरी मिळाली आहे, तर वडवणीतील पेट्रोल पंपाचा प्रस्ताव प्रलंबित असून, बीड शहरचा प्रस्ताव नाकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मानव संसाधन विभागांतर्गत बीड शहरातील नगर रोडवर यापूर्वीच एक पेट्रोल पंप उभारण्यात आला आहे. मात्र, येथील वाहनांची संख्या पाहता त्यावर गर्दी होताना दिसून आली. त्यामुळे बीड शहर पोलीस ठाण्यांतर्गत आणखी एक पेट्रोल पंप उभारण्यासंदर्भात पोलीस महासंचालकांकडे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी प्रस्ताव पाठवला होता.
याबरोबरच दिंद्रूड आणि वडवणी येथील प्रस्तावाचा देखील समावेश होता. यातील दिंद्रूडच्या पेट्रोल पंपास मंजुरी मिळाली असून, वडवणी येथील प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. बीड शहरचा प्रस्ताव मात्र जागेच्या कारणावरुन नाकारण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
बीडचा पेट्रोल पंप बनले गप्पाटप्पाचे केंद्र
नगर रोडवर असणाऱ्या पोलिसांच्या पेट्रोल पंपावर सर्वसामान्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नव्हती. तसेच पंपाच्या परिसरात बिनधास्त गप्पाटप्पा चालत असत. हे प्रकार वाढले होते. याची तक्रार येताच पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पो. ह. डी. जी. परळकर यांची पंपातून हकालपट्टी करीत मुख्यालयाचा रस्ता दाखविला. परळकरांच्या वागणुकीबद्दल बीड पोलिसांची प्रतिमा मलीन झाली होती. त्यामुळे त्यांची हकालपट्टी केल्याचे सांगण्यात आले. सध्या पो. ह. वचिष्ट वाघमारे व शिंदे हे येथे कार्यरत आहेत.
दोन्ही प्रस्ताव निकाली निघतील
दिंद्रूडमध्ये पेट्रोल पंप उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. वडवणी व बीड शहरचाही प्रस्ताव निकाली निघेल. बीड पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या वागणुकीबद्दल तक्रारी प्राप्त होताच मुख्यालयात सलग्न केले.
- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक