सत्ताधाऱ्यांना पोलिसांचे अभय; बँक मॅनेजरला कॅबिनमध्ये घुसून मारहाण करणारे आरोपी मोकाटच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 05:54 PM2024-06-29T17:54:18+5:302024-06-29T17:55:40+5:30
मारहाण करणारे वडवणीच्या माजी नगराध्यक्षाचा मुलगा आणि भाजप कार्यकर्ता धनराज मुंडे व अरूण मुंडे हे दोघेही पाच दिवसानंतरही मोकाटच आहेत.
बीड : कर्ज प्रकरणाच्या फाईलमध्ये त्रूटी काढल्याने वडवणी येथील एसबीआय बँकेच्या मॅनेजरला कक्षात घुसून मारहाण करणारे वडवणीच्या माजी नगराध्यक्षाचा मुलगा आणि भाजप कार्यकर्ता धनराज मुंडे व अरूण मुंडे हे दोघेही पाच दिवसानंतरही मोकाटच आहेत. त्यांच्या अटकेसाठी बीडमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी मोर्चाही काढला होता, परंतू वडवणी पोलिसांनी सत्ताधारी पक्षाचा असल्याने त्यांना अभय देण्याचा प्रकार केला आहे. सामान्यांना खाकीचा धाक दाखविणारे पोलिस सत्ताधाऱ्यांना अटक करत नसल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या प्रकरणातून समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होऊन विश्वास कमी हाेत चालला आहे.
वडवणी येथील एसबीआय बँकेचे शाखा प्रबंधक युवराज पाटील यांना मारहाण केल्याची घटना २४ जून रोजी घडली होती. याप्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात भाजप कार्यकर्ता धनराज राजेभाऊ मुंडे आणि त्यांचा सहकारी अरूण मुंडे यांच्यावर वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर २७ जून रोजी या दोघांना अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व बँकिंग अधिकारी व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तरीही वडवणी पोलिसांनी या दोघांना अटक केलेली नाही. त्यामुळे कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना कक्षात घुसून शिवीगाळ केल्याप्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यातही अटक झाली नव्हती. ही घटना ११ मे २०२३ रोजी घडली होती.
बँक कर्मचारी कामबंदच्या तयारीत
धनराज मुंडे व अरूण मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांच्या अटकेसाठी मोर्चा काढूनही वडवणी पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करत आरोपींना अटक केली नाही. त्यामुळे संतापलेले बँक कर्मचारी आता कामबंद करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी वेळीच लक्ष देऊन आरोपींना अटक करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. दरम्यान, याबाबत वडवणीचे सहायक पाेलिस निरीक्षक अमन सिरसाट यांना फोनवरून संपर्क केला. परंतू त्यांचा फोन न लागल्याने बाजू समजली नाही.
चौकशी करू
मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून आहे. आरोपी कोणीही असो, आम्ही त्याला अटक करणारच आहोत. आमचे प्रयत्न सुरूच आहे. काही चुकीचे प्रकार घडतात, हे ऐकून वाईट वाटते. आमचेही पोलिस जर पाठिशी घालत असतील तर चौकशी करू.
- धीरजकुमार बच्चू, सहायक पोलिस अधीक्षक माजलगाव