करुणा शर्मांच्या मुंबईतील घराची पोलिसांकडून झडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:40 AM2021-09-09T04:40:58+5:302021-09-09T04:40:58+5:30
बीड / अंबाजोगाई : परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात जातिवाचक शिवीगाळ करून एका महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन ...
बीड / अंबाजोगाई : परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात जातिवाचक शिवीगाळ करून एका महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांनी बुधवारी अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या जामीन अर्जावर १४ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, शर्मा यांच्या मुंबईतील घराची बीडच्या पोलिसांनी झडती घेतली.
पालकमंत्री धनंजय मुंडे हे पती असल्याचा दावा करीत त्यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या करुणा शर्मा ५ सप्टेंबर रोजी परळीत आल्या होत्या.
येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात जातिवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून करुणा शर्मा आणि अरुण दत्तात्रय मोरे (दोन्ही रा. मुंबई) यांच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले होते. ६ सप्टेंबर रोजी अंबाजोगाई अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी, तर अरुण मोरे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने अरुण मोरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. सध्या दोघेही जिल्हा कारागृहात आहेत. ८ सप्टेंबर रोजी करुणा शर्मा व अरुण मोरे यांनी वकिलामार्फत अंबाजोगाई अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, दरम्यानच्या काळात सुट्या येत असल्याने त्यांच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे करुणा शर्मांना १४ सप्टेंबरपर्यंत कोठडीत राहावे लागणार हे निश्चित झाले आहे.
....
पुरावे गोळा करण्यासाठी परळी पोलीस मुंबईत
करुणा शर्मा यांच्याविराेधात सबळ पुरावे गोळा करण्यासाठी परळी पोलिसांनी न्यायालयाकडे करुणा शर्मा यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, सबळ पुरावे गाेळा करण्यासाठी करुणा शर्मा यांच्या मुंबईतील घराची पोलिसांनी झडती घेतली. तेथून नेमके काय हस्तगत केले, हे मात्र समोर येऊ शकले नाही.
...
म्हणे, फोनवर सांगू शकत नाही
याबाबत उपअधीक्षक सुनील जायभाये यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मुंबईतील घराची झडती घेतल्याचे फोनवर सांगू शकत नाही, असे उत्तर दिले. आवाज येत नाही, नंतर बोलू असे सांगून त्यांनी टाळाटाळ केली तर अप्पर अधीक्षक स्वाती भोर यांनी कॉल स्वीकारला नाही.
....