२ महिन्यांपूर्वी धाड टाकलेला अवैध कत्तलखाना पुन्हा सुरु;१३ लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 04:07 PM2022-02-24T16:07:32+5:302022-02-24T16:07:42+5:30
दौलावडगांव येथील अवैध कत्तलखान्यावर डिसेंबर महिन्यांत बीड पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली होती.
कडा (बीड ) : आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील दौलावडगांव येथील अवैध कत्तलखान्यावर बुधवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली. यावेळी दोन टन गोमांस, दोन वाहनांसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौलावडगांव येथील अवैध कत्तलखान्यावर डिसेंबर महिन्यांत बीड पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली होती. यावेळी पोलिसांनी २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. या घटनेला दोन महिने होत नाही तोच परत येथील कत्तलखाना पुन्हा सुरू करण्यात आला. याची माहिती बीड येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली.
यावरून कुमावत यांच्या पथकाने आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास दौलावडगांवपासून जवळच असलेल्या अवैध कत्तलखान्यावर धाड टाकली. यावेळी पाच टन गोमांस, दोन चारचाकी वाहन असा १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर ११ जणांवर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, केजचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलिस हवालदार बालाजी दराडे, पोलिस हवालदार सुहास जाधव,पोलिस नाईक सचिन अहंकारे,पोलिस शिपाई संजय हल्ले,पोलिस नाईक राजु वंजारे सह अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने, भडके, पोलिस नाईक प्रल्हाद देवडे यांनी केली.