अवैध गर्भपात प्रकरणात जामिनावर असलेल्या डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयावर छापा, पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 09:23 AM2020-09-06T09:23:35+5:302020-09-06T09:28:10+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने आरोग्य विभागाची मोठी कारवाई
परळी : देशभरात गाजलेल्या अवैध गर्भपाताच्या गुन्ह्यात जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या डॉ. सुदाम मुंडे याने बेकायदेशीरपणे दवाखाना सुरु ठेवला. याची कुणकुण लागल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने शनिवारी मध्यरात्री सदरील दवाखान्यावर छापा मारला. यावेळी काही संशयास्पद साहित्य आणि औषधी सापडले असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच, या दवाखान्यात कोरोना संशयित रुग्णांवर देखील उपचार सुरु होता असा संशय व्यक्त केला जात आहे. डॉ सुदाम मुंडे यास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी ही कारवाई केली.
२०१२ सालच्या एका अवैध गर्भपात प्रकरणी बीड जिल्हा न्यायालयाने सुदाम मुंडेला पत्नी सरस्वतीसह दोषी ठरवून दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. परंतु, ही शिक्षा भोगत असताना काही महिन्यापूर्वी त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने परळीजवळ बेकायदेशीरपणे दवाखाना सुरु केला. याबाबत आरोग्य विभागाकडे माहिती आली होती. त्यानंतर पाळत ठेऊन ही कारवाई करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, शल्य चिकित्सक अशोक थोरात हे स्वतः परळीत तळ ठोकून होते. रात्री तब्बल सहा ते सात तास ही कारवाई सुरु होती. यावेळी गर्भपातासाठी आवश्यक असणारे काही संशयास्पद साहित्य आणि औषधी सापडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच या दवाखान्यात कोरोना संशयित रुग्णांवर देखील उपचार सुरु होता असा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सध्या सुदाम मुंडेला पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्याची चौकशी सुरु आहे.
डॉ. सुदाम मुंडेच्या कुकर्माचा पूर्वेतिहास :
परळीतील उच्चशिक्षित असलेले सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे हे डॉक्टर दांपत्य आर्थिकदृष्ट्याही सक्षम होते. पत्नी डॉ. सरस्वती स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. सुदाम स्त्रीरोग आणि अस्थिरोग शल्यचिकित्सक असा दुहेरी पदविधारक होता. परळीतील मोजक्या स्त्रीरोग तज्ज्ञांपैकी असल्याने या दांपत्याचा वैद्यकीय व्यवसायही जोरात होता. त्यातच बसस्थानकासमोर असल्याने त्याचे रुग्णालय गजबजलेले असायचे. यातून मिळणाऱ्या पैशांवर समाधानी नसलेल्या या दांपत्याने पेशाला काळीमा फासायला सुरवात केली आणि बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात सुरू केले. परळीतील मोजक्या आर्थिक सक्षम व्यक्तींपैकी एक असल्याने त्याची राजकीय उठबसही होतीच. याचाच गैरफायदा घेत त्याने महसूल, पोलिस, आरोग्य यंत्रणा आपल्या खिशात असल्याचा आविर्भाव आणला आणि आपल्या या कृत्याचा फैलाव वाढविला होता. डॉ. सुदाम मुंडे हा राजरोस बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात करी. मात्र, त्याने निर्माण केलेल्या दबावामुळे कुठलीही यंत्रणा डोळेझाक करी. डॉ. सरस्वती व डॉ. सुदाम मुंडे हे स्त्रीरोग तज्ज्ञ असले तरी इथे स्त्री रुग्णांवरील उपचार कधी झालेच नाहीत. गर्भलिंगनिदान, गर्भपात यासाठीच हे रुग्णालय कुप्रसिद्ध होते. आरोग्य विभागाने केवळ १० खाटांची परवानगी दिली असताना या रुग्णालयात ६४ खोल्यातून तब्बल ११७ खाटा होत्या. राज्यातील विविध भागांसह शेजारच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लोक येथे येत असत. त्यामुळे अक्षरशः या रुग्णालयात नेहमीच जत्रा भरलेली असायची. सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना पुढच्या खुर्चीवर बसणारा सुदाम मुंडे इकडे रुग्णालयात राजरोस बेकायदा गर्भातील कळ्या खुडत असे. गर्भपातासाठी लागणाऱ्या विक्रीडिल या औषधींच्या व्हाईल्सची जेवढी जिल्ह्यात मागणी आणि विक्री असे, त्यातली 70 टक्के मागणी आणि उपयोग एकट्या डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयात होई. वर्ष 2010 ते 2012 या कालावधीत त्याच्या रुग्णालयात तब्बल तीन हजार 940 एवढ्या गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या विक्रीडिल या औषधींचा वापर झाला. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर थेट आरोप करूनही कुठलीच यंत्रणा दखल घेत नसे.
मात्र, सुदाम मुंडेने 18 मे 2012 रोजी विजयमाला महादेव पटेकर (रा. भोपा, ता. धारूर) या ऊसतोड मजूर महिलेचा बेकायदा गर्भपात केला. यातच तिचा मृत्यू झाला आणि डॉ. मुंडेच्या पापाचा घडा भरला. या प्रकरणी कलम 304, 312, 314, 315 आणि 316 नुसार गुन्हा दाखल झाला होता. यात पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार, सेक्शन 3A, सेक्शन 9, सेक्शन 17, सेक्शन 29 नुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. या सोबतच एमटीपी कायद्यानुसार सेक्शन 4 आणि 6 चा गुन्हा या दाम्पत्यावर दाखल झाला होता. एकूण १७ आरोपी या प्रकरणामध्ये होते. त्यातल्या जळगावच्या डॉ. राहुल कोल्हे यांचे अपघाती निधन झाले होते. इतर दोघांचाही दरम्यानच्या काळात मृत्यू झाला होता. या प्रकरणी उर्वरित ११ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह डॉक्टर दाम्पत्याला न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. सहा महिन्यापूर्वी त्याला सर्वोच्च न्यायालयातून जमीन मिळाला होता.