बीडमध्ये पोलीस भरतीस सुरुवात ;७५० उमेदवारांची मैदानी चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:18 PM2018-03-12T23:18:48+5:302018-03-12T23:19:09+5:30
बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी पोलीस भरतीला सुरूवात झाली. पहाटेपासूनच पुरूष उमेदवारांनी याठिकाणी गर्दी केली होती. उजाडायच्या वेळी मैदानी चाचणी घेण्यास सुरूवात झाली. पहिल्या दिवशी ७५० उमेदवारांच्या चार प्रकारांत मैदानी चाचण्या घेण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी पोलीस भरतीला सुरूवात झाली. पहाटेपासूनच पुरूष उमेदवारांनी याठिकाणी गर्दी केली होती. उजाडायच्या वेळी मैदानी चाचणी घेण्यास सुरूवात झाली. पहिल्या दिवशी ७५० उमेदवारांच्या चार प्रकारांत मैदानी चाचण्या घेण्यात आल्या. गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस दलाने योग्य नियोजन केले आहे. तसेच नियोजनासाठीही तगडा फौजफाटा नियुक्त केला आहे. प्रत्येक उमेदवाराची चाचणी ही ‘इन कॅमेरा’ होत आहे. पहिल्या दिवसाची भरती शांततेत पार पडली.
महिनाभरापासून तयारी करण्यात येत असलेल्या पोलीस भरतीला सोमवारपासून सुरूवात झाली. ५३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी ८ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. उमेदवारही मागील तीन चार महिन्यांपासून याची तयारी करीत होते. पूर्ण तयारीनिशी सर्व उमेदवार सोमवारी पहाटेच पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचण्या देण्यासाठी दाखल झाले.
मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाची नोंद करून त्यांना मैदानात सोडण्यात आले. येथे नियूक्त अधिकारी, कर्मचा-यांनी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून घेतली. त्यानंतरच त्यांना मैदानी चाचणीसाठी पुढे पाठविण्यात आले. पहिल्या दिवशी पुल अप, १०० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक या चार प्रकारांची चाचणी घेण्यात आली. यावेळी नियोजनासाठी प्रत्येक ठिकाणी अधिकारी, कर्मचारी नियूक्त केले होते.
भरतीसाठी मोठ्या संख्येने युवक आल्याने नगर रोड परिसरात बेरोजगारांचे जत्थे नजरेस पडत होते. जागेच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्यामुळे ही भरती प्रक्रिया नियोजनबद्ध राबविण्यात येत आहे.
एसपी, एएसपींकडून सूचना
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे हे पहाटेपासूनच मुख्यालयावर तळ ठोकून होते. गडबड गोंधळ होणार नाही, नियोजन बिघडणार नाही, यासाठी वेळोवेळी ते आपल्या अधिकारी, कर्मचाºयांना सूचना करीत होते. त्यामुळे पहिला दिवस शांततेत गेला. उमेदवार व अधिकारी, कर्मचाºयांना संशय वाटताच ते वरिष्ठांकडे धाव घेत होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही समस्या तात्काळ दूर करण्यात येत होती.
कॅमे-यांमुळे पारदर्शकता
मैदानी चाचणी घेताना प्रत्येक उमेदवाराची चाचणी ही कॅमे-यांच्या निगराणीखाली घेतली जात होती. धावण्यात काही उमेदवारांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना तात्काळ कॅमेरा शुटींग दाखविल्यावर त्यांच्या मनातील गैरसमज दूर झाला. कॅमे-यांचा वापर केल्यामुळे भरतीत पारदर्शकता आली आहे, शिवाय गैरप्रकारांनाही आळा बसला आहे.
आजपासून हजार उमेदवार
पहिल्या दिवशी ७५० उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. यापुढे प्रत्येक दिवशी एक हजार उमेदवारांची चाचणी घेतली जाणार आहे. तसे नियोजनही बीड पोलिसांनी केले आहे. आज १६०० मीटर धावणे व इतर चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
उमेदवारांना वैद्यकीय सेवा
भरती प्रक्रियेदरम्यान, अनेकांना चक्कर येणे, जखम होणे असे प्रकार घडतात.
त्यांना तात्काळ उपचार देण्याबरोबरच चाचणीसाठी सक्षम करण्यासाठी याठिकाणी वैद्यकीय सेवा उपलब्ध केली आहे. तसेच रूग्णवाहिकाही आहे. सोमवारी कोणालाही चक्कर आली किंवा जखम झाली नाही.
च-हाटा रोडवरील वाहतूक व्यवस्थेत बदल
मंगळवारपासून १६०० मीटर धावणे चाचणी होणार आहे. ही चाचणी शहरापासून काही अंतरावर असलेल्या च-हाटा फाटा रोडवर होणार आहे. त्यासाठी चºहाटा फाटा ते उखंडा हा चºहाटा मार्गे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून चºहाटा व पाटोद्याकडून येणारी वाहने उखंडा फाटा, गजानन कारखाना मार्गे बीडला येतील. बीडकडून जाणारी वाहने चºहाटा फाटा, मुर्शदपूर फाटा, गजानन कारखाना, उखंडा फाटा मार्गे पाटोदा रोडने जातील, अशी माहिती पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे. वाहनधारकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.
मला पोलीस व्हायचं !
मनात पोलीस होण्याची इच्छा बाळगणाºया उमेदवारांनी उन्हाची तमा न बाळगता सोमवारी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हजेरी लावली. त्याचबरोबर चाचणी दरम्यान आपल्या गुणकौशल्याचे प्रदर्शन केले.