कानिफनाथ घाटात पोलिसांची धावपळ अन् गोणीत निघाले मृत श्वान!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 08:15 PM2023-12-04T20:15:12+5:302023-12-04T20:16:50+5:30
बीड-धामणगाव नगर राज्य महामार्गावरील कानिफनाथ घाटातील प्रकार
- नितीन कांबळे
कडा- घाटातील झाडाझुडपात एका गोणीतून दुर्गंधी सुटल्याची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी जवाजम्यासह तात्काळ धाव घेतली. पाहणी केली असता गोणीत मृत श्वान आढळून आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही घटना आज दुपारी बीड-नगर राज्य महामार्गावरील कानिफनाथ घाटात घडली.
बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावरील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील कानिफनाथ घाटात झाडाझुडपात एका पांढर्या रंगाच्या गोणीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान पोलिसांना दिली. पोलिसांनी कसलाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक, वनविभागाचे कर्मचारी यांच्यासोबत प्राथमिक पाहणी केली असता मृतदेह असल्याची शंका निर्माण झाली. प्रत्यक्षात सूक्ष्म तपासणीनंतर गोणीमध्ये श्वानाचा मृतदेह आढळून आला.
यावेळी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे,पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ याच्यासह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.