पोलीस ठाण्यांमधील ‘डीबी’ पथक नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:39 AM2018-12-02T00:39:15+5:302018-12-02T00:39:54+5:30
प्रत्येक पोलीस ठाण्यात नियूक्त केलेले डीबी (डिटेक्टिव्ह ब्रँच) पथक केवळ नावालाच असल्याचे समोर आले आहे. मागील दोन महिन्यात चोरी व बॅग लुटीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना एकाही चोरीचा तपास लावण्यात या पथकांना यश आलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण असून या पथकांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : प्रत्येक पोलीस ठाण्यात नियूक्त केलेले डीबी (डिटेक्टिव्ह ब्रँच) पथक केवळ नावालाच असल्याचे समोर आले आहे. मागील दोन महिन्यात चोरी व बॅग लुटीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना एकाही चोरीचा तपास लावण्यात या पथकांना यश आलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण असून या पथकांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात चोरी, घरफोडी, लुटमार, चैन चोरी सारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांकडून तात्काळ घटनास्थळी जावून पंचनामा केला जातो. या घटनांचा तात्काळ तपास लागावा, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एका डीबी पथकाची नियूक्त केलेले आहे. या पथकात साधारण एका अधिकाऱ्यासह पाच ते सहा कर्मचाºयांचा समावेश आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून या पथकांची कामगिरी फारशी उल्लेखनीय नसल्याचे दिसून येत आहे.
वारंवार एवढ्या घटना घडूनही डीबी पथक शांतच आहेत. त्यांच्या तपासाबद्दल आणि कामकाजावर आता संशय व्यक्त केला जात आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकालाही या घटनांचा तपास लावण्यात अद्याप यश आलेले नाही. एकुणच मागील मागील काही दिवसांपासून पोलिसांच्या कामगिरीबद्दल नागरिक असमाधानी असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांनी रखडलेल्या गुन्ह्यांचा तात्काळ तपास लावून नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करावा, तसेच शहरातील गस्तीमध्ये वाढ करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांंमधून होत आहे.
नाव दरोड्याचे, अन् कारवाई जुगारावर
४गंभीर व दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी दरोडा प्रतिबंधक ही विशेष शाखा आहे. मात्र ही शाखा सध्या गुटखा, जुगार व इतरच कारवाया करण्यातच व्यस्त असल्याचे दिसते.
ठाणे प्रभारींचे दुर्लक्ष
आपल्या आखत्यारीत असलेल्या डीबी पथकाच्या नियमित कामगिरीचा आढावा घेण्यास संबंधीत ठाणे प्रमुखही उदासीन असल्याचे दिसते. त्यांच्या दुर्लक्षामुळेच हे पथक नावाला राहिले आहेत. प्रभारींनी वेळच्या वेळी आढावा घेण्याबरोबरच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केल्यास तपासाची टक्केवारी वाढू शकते. मात्र तसे होत नाही, हे विशेष.
उपअधीक्षकांकडून कानाडोळा
प्रत्येक उपविभागासाठी एक पोलीस उपअधीक्षक आहेत. सर्व जागा भरलेल्या आहेत. मात्र या उपअधीक्षकांकडून ठाणे प्रभारींच्या कामकाजाकडे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळेच ठाण्यातील इतर पथके व अधिकारी, कर्मचारी सुस्त झाल्याचे दिसते.
शिवाजीनगर ठाण्याने
केला एक तपास
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने एका साखळी चोराला पकडून दोन गुन्हे उघडकीस आणले होते. पोलीस उपनिरीक्षक आर.ए. सागडे यांनी ही कारवाई केली होती. तसेच सलग दोन दिवस कत्तलसाठी जाणारी दोन वाहने पकडून त्यातील ३० जनावरांना जीवदान दिले होते.
बॅग लुटीच्या सात घटना
मागील दोन महिन्यात बॅग लुटीच्या सात घटना घडल्या आहेत. बीडमध्ये चार, परळी दोन व अंबाजोगाईतील एका घटनेचा समावेश आहे. यामध्ये रोख लाखो रूपयांची रक्कम लंपास करण्यात आलेली आहे. तसेच दिवाळीत बीड शहर व शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत चोºया, घरफोड्या झालेल्या आहेत. याचा तपासही अद्याप लागलेला नाही.