'चाय पे चर्चा' करत पोलीस अधीक्षकांनी साधला संवाद; सामाजिक सलोखा राखण्याचे केले आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 04:03 PM2019-11-09T16:03:16+5:302019-11-09T16:07:21+5:30
परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांनी आपसातील ऐक्य, सामाजिक सलोखा राखावा व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले.
बीड : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हयात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी शहरात शांतता आणि सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी पुढाकार घेत शहरातील विविध भागात जात नागरिकांसोबत चहा घेत संवाद साधला. पोलीस अधीक्षकांच्या या कृतीने शहरात सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून नागरिक शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
बीड शहरासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त आहे. यावेळी परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या. दुपारी शहरातील काही गल्ली-मोहोल्ल्यात जात त्यांनी नागरिकांसोबत चहा घेत संवाद साधला. तसेच परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांनी आपसातील ऐक्य, सामाजिक सलोखा राखावा व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले. पोलीस प्रशासन हे निःपक्षपातीपणे सर्वांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. त्यांनी केलेल्या या कृतीमुळे नागरिकांमधून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे.