चोरट्यांकडून पोलीस ‘टार्गेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:19 AM2019-04-15T00:19:00+5:302019-04-15T00:19:30+5:30
बीड : बीड शहरातील अंबिका नगर भागात पोलीस निरीक्षकांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. तर धारूर तालुक्यातील आडस येथील पोलीस ...
बीड : बीड शहरातील अंबिका नगर भागात पोलीस निरीक्षकांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. तर धारूर तालुक्यातील आडस येथील पोलीस चौकीसमोरून कर्तव्यावर असलेल्या सहायक फौजदाराची दुचाकी लंपास केली. या दोन्ही घटनांमुळे खळबळ उडाली आहे.
बाळासाहेब आघाव हे उस्मानाबाद येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. ते आपल्या कुटूंबासह बीडमधील अंबिकानगर भागात राहतात. शनिवारी रात्री ते कुटुंबासह घरात झोपले होते. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्यांना खिडकीचा आवाज आला. त्यांना तात्काळ जाग आली. ते सावध झाले आणि खिडकीत आले. याचवेळी त्यांना काही लोक दिसले. त्यांनी आवाज दिला. आवाज ऐकून चोरटे पसार झाले. गडबडीत त्यांनी दुचाकीही जागेवरच ठेवली. हा प्रकार त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्याला सांगितला. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे, पोह ए.ए.औसरमल यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणाची नोंद झाली आहे.
दुसरी घटना केज तालुक्यातील आडस येथे घडली. केज ठाण्याचे सहायक फौजदार अशोक चाटे हे आडस येथे राजकीय सभेच्या बंदोबस्तासाठी आले होते. दुचाकी पोलीस चौकीसमोर लावून ते बंदोबस्तावर गेले. परत आल्यावर त्यांना आपली दुचाकी दिसली नाही. त्यांनी तात्काळ धारूर ठाणे गाठून याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोह अ.पठाण हे करीत आहेत.
पोलीस निवडणूक बंदोबस्तात व्यस्त
सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. रामनवमी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात व्यस्त आहेत. यासह राजकीय नेत्यांच्या सभांचाही पोलिसांना बंदोबस्त आहे.
त्यामुळे पोलीस व्यस्त आहेत. याचाच फायदा चोरटे घेत आहेत. मात्र, आता चक्क पोलिसांचीच घरे टार्गेट केल्याने चोरट्यांची हिंमत वाढल्याचे दिसून
येत आहे.