पोलिसांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन पाच मुलींचे विवाह टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:40 AM2021-02-17T04:40:05+5:302021-02-17T04:40:05+5:30
अनिल गायकवाड कुसळंब : पाटोदा शहराजवळ असलेल्या भटक्या-विमुक्तांच्या वसाहतीत सर्वसामान्य गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींचे होणारे बालवयातील विवाह हळद लागण्यापूर्वीच ...
अनिल गायकवाड
कुसळंब : पाटोदा शहराजवळ असलेल्या भटक्या-विमुक्तांच्या वसाहतीत सर्वसामान्य गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींचे होणारे बालवयातील विवाह हळद लागण्यापूर्वीच पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आले.
१६ फेब्रुवारीला मंगळवारी दुपारी १३ ते १५ वयोगटांतील पाच अल्पवयीन मुलींचे बालविवाह होणार होते. ही बेकायदेशीर बाब पोलिसांना गुप्तरित्या समजली. १५ फेब्रुवारीला हळदीचा कार्यक्रम हाेता, त्याची तयारी सुरू असतानाच पाटोदा ठाण्याचे पोलीस कर्मचारी तेथे पोहोचले. यावेळी संबंधित मुलींच्या पालकांना पोलिसांनी कायद्यासंदर्भात विविध माहिती समजावून सांगितली. अल्पवयात विवाह केल्यानंतरचे दुष्परिणाम सांगितले. कायद्यानुसार मुलीच्या वयाची १८ वर्षे लागतात याचीही माहिती दिली. पोलीस महिला दक्षता समितीच्या वतीने सुरेखा खेडकर यांनी या कुटुंबीयांचे समुपदेशन केले.
यावेळी पाटोदा ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. बळिराम कातकडे, पो. कॉ. बाळू सानप, पो. कॉ. खेडकर आदी उपस्थित होते.
हळद लागणार एवढ्यात पोलीस दारात
१६ फेब्रुवारीला या विवाहाचा मुहूर्त काढला होता. तत्पूर्वी सोमवारी पंधरा तारखेला हळदीचा कार्यक्रम नियोजित होता; परंतु ही माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना समजली आणि खात्री केल्यानंतर पोलीस या वसाहतीत दत्त म्हणून पोहोचले. हळद लागणार तेवढ्यात पोलिसांची गाडी दारात आली आणि अल्पवयीन मुलींचे होणारे तब्बल पाच बेकायदेशीर विवाह रोखले गेले.
सर्वांच्या दक्षतेमुळे यश
‘बालविवाह कायदानुसार व शारीरिकदृष्ट्या घातकच' आहे. परंतु अज्ञानातून केवळ १३ ते १५ वयोगटांतील या पाच मुलींचे होणारे विवाह ही अत्यंत दुर्दैवी बाब होती; परंतु ही घटना पोलिसांना समजली आणि तत्काळ तेथे महिला दक्षता समितीच्या सदस्यांसह व पोलिसांनी त्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले आणि ते होणारे पाच बालविवाह रोखण्यात यश आले.
- महेश आंधळे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक,
पोलीस ठाणे, पाटोदा.