आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:57 AM2018-05-26T00:57:51+5:302018-05-26T00:57:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सातारा जिल्ह्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या सातारा आणि बीडच्या पोलिसांना आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केली. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील नाळवंडी येथील लक्ष्मी तांड्यावर घडली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
बीड तालुक्यातील नाळवंडी तांडा येथील गोवर्धन लक्ष्मण राठोड आणि मैदा येथील देवीदास मोतीराम राठोड या ऊसतोड मुकादामांवर उचल घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील भूईज ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या दोघांना अटक करण्यासाठी २३ मे रोजी भूईज ठाण्याचे पोलीस कर्मचारी जितेंद्र इंगुळकर आणि भोसले हे बीड जिल्ह्यात आले होते.
त्यांनी पिंपळनेर पोलिसांना सदर प्रस्तावित कारवाईबद्दल कल्पना दिली असता पोलीस कर्मचारी कांदे यांना त्यांच्यासोबत मदतीला देण्यात आले. या सर्वांनी लक्ष्मी तांडा येथे जाऊन गोवर्धन राठोड यास ताब्यात घेतले असता त्याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. ‘तुम्हाला महागात पडेल, मी पत्रकारांना बोलावून घेईल’ अश्या धमक्या तो देऊ लागला.
त्याचा गोंधळ ऐकून त्याची पत्नी राधाबाई राठोड, सून सुनिता राठोड, मुलगा संजय राठोड तसेच त्याचे गावातील शिवाजी लिंबा राठोड, नरहरी काशीनाथ राठोड, चंद्रकांत रेखू राठोड (सर्वजण रा. नाळवंडी लक्ष्मीतांडा) हे तिथे जमा झाले आणि त्यांनी तिन्ही पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केली.