महिला सुरक्षेसाठी पोलिसांचा नवीन उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 11:50 PM2019-12-02T23:50:12+5:302019-12-02T23:51:40+5:30
महिलांना सुरक्षा देण्यासाठी ‘कवच’ या नावाने नवीन सेल सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
बीड : काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे एका महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणानंतर बीडपोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी निर्णय घेतला आहे. पूर्वीची सुरक्षेसाठी असलेली ‘बडी कॉर्प’ उपक्रम अधिक प्रभावी करत अडचणीत सापडलेल्या अथवा असुरक्षित वाटत असलेल्या महिलांना सुरक्षा देण्यासाठी ‘कवच’ या नावाने नवीन सेल सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यापूर्वी पोलीस दलात महिलांच्या सुरक्षेसाठी ‘बडी कॉर्प’ हा विभाग अस्तित्वात होता. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नव्हती. मागील काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्याप्रकरणानंतर बीड जिल्हा पोलिसांनी महिला सुरक्षेसाठी नवे पाऊल उचलले आहे. महिलांना सुरक्षा देता यावी यासाठी प्रोजेक्ट ‘कवच’ सुरु करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. तसेच हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रत्येक ठाण्यात एक महिला पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी समन्वय अधिकारी म्हणून आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे काम पाहणार असल्याचे पोद्दार म्हणाले. यावेळी बीड उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
महिलांचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवणार
प्रोजेक्ट ‘कवच’ या अभियानांतर्गत जिल्ह्यात रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत कोणत्याही भागात एखाद्या महिलेने असुरक्षित असल्याचे पोलीस नियंत्रण कक्ष बीड येथे (०२४४२ -२२२६६६ , ०२४४२-२२२३३३ या क्रमांकावर किंवा १०९१ या हेल्पलाइनवर) कळवावे. त्यानंतर संबंधित महिलेला जवळ असलेल्या पोलीस ठाण्यातील किंवा गस्तीवर असलेल्या पथकाच्या वाहनातून सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जाईल.
प्रत्येक पोलीस ठाण्यातील महिला ‘बडी कॉर्प’ त्या क्षेत्रातील कामानिमित्त बाहेर जावे लागत असलेल्या महिलांचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवणार असून त्याद्वारे कामाच्या ठिकाणी जर कोणाकडून शोषण झाले तर त्याची तक्रार याद्वरे केली जाणार आहे. त्यावरुन चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून करता येणार तक्रार
महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भातच्या गुन्ह्यात हद्दीचा प्रश्न यापुढे नसणार आहे. एखादी तक्रार आल्यास कोणत्याही ठाण्याने अगोदर ती दाखल करुन घ्यावी लागणार आहे. तसेच तातडीने प्रतिसाद देत महिलेला सुरक्षित वातावरण निर्माण करुन देणे गरजेचे आहे. अशा सूचना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत.