‘राजकारणाचे जोडे गडाबाहेर असावेत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:44 AM2019-01-28T00:44:37+5:302019-01-28T00:45:32+5:30
राजकारणाचे जोडे गडाच्या बाहेर असले पाहिजेत अशी शिकवण आमच्या संस्काराची आहे. असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राजकारणाचे जोडे गडाच्या बाहेर असले पाहिजेत अशी शिकवण आमच्या संस्काराची आहे. कोणत्याही गडावरून आम्ही कधी राजकारण केलं नाही. अहिंसा व प्रेमाची शिकवण संतांनी समाजाला दिली त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. शनिवारी श्रीक्षेत्र नारायणगड तीर्थक्षेत्र येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, महंत शिवाजी महाराज यांच्या साक्षीने गडावर चांगल्या कामाची सुरुवात झाली आहे. मी या गडाची नात आहे, या नात्याने त्यांच्या निमंत्रणावरून मी येथे आले. गडाच्या विकास कामासाठी २५ कोटीचा निधी दिला, यापैकी ३ कोटी निधी नुकताच वर्ग करण्यात आला. रस्त्यासाठी निधी दिला असे असले तरी श्रेयासाठी मी कधीच काम करत नाही. लोकनेते मुंडे साहेबांनी गडासाठी जो शब्द दिला होता तो आपण पाळल्याचे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडाचे महंत शिवाजी महाराज उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस, बदामराव पंडित, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, लक्ष्मण महाराज मेंगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, राजेंद्र मस्के, गडाचे विश्वस्त दिलीप गोरे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा आदी यावेळी उपस्थित होते.
गट- तट बाजूला ठेवून विकास व्हावा
धाकटी पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न चालू आहेत. गट-तट बाजूला ठेवून विकास झाला पाहिजे. कोणी निधी दिला हे महत्वाचे नसून विकास होणे महत्वाचे आहे. अध्यात्मिक वैभव म्हणून नारायणगड जिल्ह्याचे श्रध्दास्थान असल्याचे आ.जयदत्त क्षीरसागर यावेळी म्हणाले.
आमच्या जिल्ह्यात येऊन गलिच्छ राजकारण
व्यासपीठावरील नेते विविध राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. पण जिल्हयाच्या विकासासाठी आम्ही सर्वांनी एकत्रित येवून काम केले. पण काहींना हे जमत नाही त्याला काय करणार? आमच्या जिल्हयात येवून गलिच्छ राजकारण करणारांना हा संदेश असल्याचे त्या म्हणाल्या. चांगल्या माणसांना एकत्र आणून जिल्हयाची प्रगती करायची आहे, आपल्या आशीर्वादाची थाप पाठीवर असावी अशी अपेक्षा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.