Pooja Chavan Suicide Case: शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करा; पूजा चव्हाणच्या वडिलांची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
By सुमेध उघडे | Published: March 2, 2021 06:53 PM2021-03-02T18:53:22+5:302021-03-02T18:57:17+5:30
Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजीनामा दिला असला तरी यावरून निर्माण झालेला वाद शमण्याऐवजी अधिकच भडकत जात आहे.
परळी : पूजा चव्हाण प्रकरणात मौन बाळगण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप शांताबाई राठोड या महिलेने केला होता. हा आरोप खोटा आहे. हा आरोप करणारी महिला शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार पुजाच्या वडिलांनी आज परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यामुळे या प्रकरणाला आता आणखी एक वळण मिळाले आहे.
संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजीनामा दिला असला तरी यावरून निर्माण झालेला वाद शमण्याऐवजी अधिकच भडकत जात आहे. पूजा चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन संजय राठोड यांचा बळी देऊ नका असा उल्लेख केला होता. त्यानंतर पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी या प्रकरणात मौन बाळगण्यासाठी तिच्या आईवडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा दावा केल्याचा गौप्यस्फोट केला. हे आरोप फेटाळून लावत लहू चव्हाण यांनी पूजाच्या मृत्यूबाबत कोण काय बोलतंय ते माहिती नाही, आम्ही आमच्या दु:खात आहोत, शांताबाई या आमच्या लांबच्या नातेवाईक आहेत परंतु त्यांच्यासोबत कसलेच नातेसंबंध नाहीत असे स्पष्टीकरण दिले होते.
त्यानंतर मंगळवारी त्यांनी परळी पोलीस स्टेशनमध्ये शांताबाई राठोड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यानुसार, काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी पूजा आणि आमच्याबद्दल अफवा पसरवून बदनामी करत आहेत. शांताबाई राठोड यांचा आमच्याशी किंवा पुजाशी काहीही संबंध नसताना त्या या प्रकरणात मौन बाळगण्यासाठी तिच्या आईवडिलांनी पाच कोटी रुपये घेतले असे वक्तव्य करत आहेत. त्यांचे सर्व आरोप खोटे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे.
पुरावे योग्यवेळी देऊ
शांताबाई राठोड यांनी सोमवारी (दि. १) पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद रोखठोक भूमिका मांडली. राठोड म्हणाल्या, पूजाचे आणि माझे चांगले नाते होते. तिला जोवर न्याय मिळणार नाही तोवर लढा दिला जाणार आहे. पाच कोटी रुपये दिल्याचा पुरावा योग्यवेळी नावासह देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.