धानोरा-तटबोरगाव रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:28 AM2020-12-24T04:28:55+5:302020-12-24T04:28:55+5:30
धानोरा : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा (खुर्द) ते तटबोरगाव या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील पुलावरच मोठमोठे ...
धानोरा : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा (खुर्द) ते तटबोरगाव या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील पुलावरच मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवास धोक्याचा झाला आहे.
तटबोरगाव हे मांजरा नदीच्या काठावरील गाव असून, मांजरा नदीवरील पूल हा बीड-लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याला जोडलेला आहे. या पुलावरून लातूर-उस्मानाबाद या जिल्ह्यांना जाण्याचा मार्ग आहे. सोयाबीन-ऊस व मालवाहतुकीस जवळचा मार्ग असल्याने या पुलावरून लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ असते. अरुंद पुलावरून जाताना खड्डा चुकविताना धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे. पुलाला सुरक्षा कठडा नसल्याने एकावेळी एकच वाहन जाते. जनावरेही पुलावरून जाताना खाली पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तटबोरगाव ग्रामपंचायतीने अनेक वेळा मागणी करूनही या पुलाची दुरुस्ती होत नाही.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग या भागातील पुलाच्या दुरवस्थेकडे व उंची वाढीकडे लक्ष देत नाही, तटबोरगाव हे गाव स्वातंत्र्य मिळाल्यापासून एस.टी.सेवेपासून वंचित आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या पुलाची उंची वाढवावी किंवा नवीन पुलाची उभारणी करण्याची मागणी होत आहे.