निवाऱ्यांची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:38 AM2021-08-20T04:38:22+5:302021-08-20T04:38:22+5:30
अंबेजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी निवारे आहेत. यावर्षी झालेल्या वादळी पावसाने प्रवासी निवाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था ...
अंबेजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी निवारे आहेत. यावर्षी झालेल्या वादळी पावसाने प्रवासी निवाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक प्रवासी निवाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवल्याने, तर अनेक ठिकाणचे बसण्यासाठीचे ओटे फुटल्याने प्रवासी जनतेसाठी ते निकामी ठरले आहेत. दुरुस्तीची मागणी होत आहे.
मास्कची चढ्या भावाने विक्री
अंबेजोगाई : शहरातील औषध दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एक तर मास्कचा तुटवडा दाखवला जातो, अन्यथा ते चढ्या भावाने विकले जातात, तसेच दोनपदरी आणि तीनपदरी मास्कचीही दुपटीपेक्षा अधिक दराने विक्री केली जाते. त्याचा मोठा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तर मास्कसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. यामुळे सामान्य ग्राहकांची लुबाडणूक होत आहे.
नेकनुरातील नदीपात्रातून वाळू उपसा
बीड : तालु्क्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळूतस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्यावेळी जेसीबीच्या साह्याने वाळूचा उपसा करून टिपरने व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल विभाग व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने, शासनाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाळू उपसाबंदची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला.
वीजपुरवठा वारंवार खंडित
बीड : तालुक्यातील पालसिंगण व परिसरात विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावामध्ये नेहमी वीजपुरवठा खंडित होण्यामध्ये वाढ झाली आहे. याकडे ‘महावितरण’च्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे. वीजचोरांवर कारवाई होत नसल्याने ‘महावितरण’ला भुर्दंड सहन करावा लागत आहे.
अवैधरित्या दारू विक्री सुरूच
वडवणी : काही दिवसांपूर्वी बंद झालेली अवैधरित्या दारू विक्री परिसरात जोमाने सुरू असल्याचे दिसून येत आहे, तसेच हॉटेल, पानटपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. याकडे मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे, परंतु अद्यापही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
माजलगावात गतिरोधकाची गरज
माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यांसह संभाजी चौक, सिंदफणा पात्रापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिक, वाहनधारकांमधून केली जात आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.