जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:34 AM2021-04-07T04:34:29+5:302021-04-07T04:34:29+5:30
अंबाजोगाई : तालुक्यात असलेल्या अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. अनेक शाळांच्या भिंतींना ...
अंबाजोगाई : तालुक्यात असलेल्या अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. अनेक शाळांच्या भिंतींना तडे गेले आहेत, तर अनेक शाळांमध्ये फरशीही उखडली आहे. अनेक शाळांना संरक्षक भिंत नसल्याने शाळेला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. ही शाळांची दुरवस्था दूर करा, अशी मागणी शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्ते अॅड. संतोष लोमटे यांनी केली आहे.
उलाढाल मंदावली, उपासमारीची वेळ
अंबाजोगाई : दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनााबधितांच्या आकडेवारीने ग्रामीण भागातील शेतकरी, छोटे व्यावसायिक, व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. अनेक छोट्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील आठवडी बाजार बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला व शेतमाल शेतातच पडून आहे. भाजीपाल्याची लागवड केली असली तरी बाजार बंदमुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात मंदावली आहे.
लोंबकाळणाऱ्या तारांचा धोका
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये विद्युत तारा मोठ्या प्रमाणात लोंबकळताना दिसत आहेत. याकडे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी वर्षानुवर्षे दुर्लक्ष करीत असल्याने या तारांचा धोका वाढला आहे. दोन पोलमध्ये मोठे अंतर असल्यामुळे तारा लोंबकळत आहेत. या लोंबकळणाऱ्या तारा ताणून घ्याव्यात, तसेच आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी, अशी मागणी नगरसेवक डॉ. अतुल देशपांडे यांनी केली आहे.
वाढत्या उन्हामुळे माठाचे दर दोनशेवर
अंबाजोगाई : दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. अंबाजोगाई तालुक्यात तापमान ३८ अंशांवर जाऊन पोहोचले आहे. यापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी घराबाहेर जाणे टाळले आहे. त्यामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. वाढत्या उन्हामुळे थंड पाणी पिण्यासाठी माठ खरेदीला नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. यावर्षी माठाचे दर दीडशे ते २०० रुपयांच्या घरात जाऊन पोहोचले आहेत.
गुटख्याची चोरून विक्री
अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पानटपऱ्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पानटपऱ्या बंद असल्या तरी चोरट्या मार्गाने सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाल्याची विक्री सुरूच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूम्रपान घातक असल्याने शासनाने हा निर्णय घेतला असला तरी ग्राहक मात्र गुटखाबंदीकडे दुर्लक्ष करीत आहेत.