माजलगाव कोविड सेंटरमधील रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:19 AM2021-03-29T04:19:39+5:302021-03-29T04:19:39+5:30
कोरोना साथीने गेल्या एक वर्षापासून संपूर्ण जगामध्ये थैमान घातले असून या साथीला रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह ...
कोरोना साथीने गेल्या एक वर्षापासून संपूर्ण जगामध्ये थैमान घातले असून या साथीला रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह डॉक्टर, प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रयत्न करत आहेत. माजलगाव शहराजवळील केसापुरी वसाहत या ठिकाणी चालू करण्यात आलेल्या शासकीय कोविड सेंटरमध्ये देण्यात येणारा आहार हा शासन नियमाप्रमाणे नाही. दोन वेळा आयुर्वेदिक काढा देणे आवश्यक असून, मध, मूगडाळ, पनीर भाजी, फुलका, वरण, भात, चहा, व्हेज पुलाव, हळदी, दूध, ग्रीन टी, इडली- सांभर, फळे, मटकी, सोयाबीन, शेंगदाणा लाडू आदी कोरोना रुग्णांना देणे आवश्यक असताना या ठिकाणी हे न देता केवळ भात, भाजी, पोळी एवढेच देण्यात येत आहे.
माजलगाव येथील कोविड सेंटरमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचा नाष्टा निदर्शनास येत असून, कच्च्या पोळ्या, निकृष्ट दर्जाचा भात दिला जात असल्याच्या तक्रारीमध्ये वाढ होत आहे. याबाबत वरिष्ठांना सांगून ही कसलाही बदल होत नसल्यामुळे रुग्ण वैतागले असून या माध्यमातून रुग्णांना खाजगी रुग्णालयाकडे जाण्यास प्रोत्साहन दिले जात आहे की काय, असा प्रश्न येथे असलेल्या रुग्णांना पडला आहे.
येथील निकृष्ट दर्जाचे अन्न खाण्यापेक्षा उपाशी राहिलेले बरे, अशी भावना रुग्ण करीत आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक बीड व तालुका आरोग्य अधिकारी माजलगाव यांच्याकडे आम्ही कोरोना सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचा अन्न पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आम्ही अनेक वेळा केल्या असताना याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. यात तात्काळ सुधारणा न झाल्यास याविरोधात आंदोलन करण्यात येईल.
-रंगनाथ निकम, प्रदेशाध्यक्ष
नॅशनल फिप्टी-फिप्टी फ्रन्ट पार्टी
येथील कोविड सेंटरमधील जेवण पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला जेवणाच्या दर्जात सुधारणा करण्यास सांगण्यात आले आहे.
-डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी