कापसाच्या वेचणीने काळवंडली लेकरं; मजुराअभावी वेचणीची मदार शालेय विद्यार्थ्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:45 AM2017-10-31T11:45:00+5:302017-10-31T11:47:23+5:30
आष्टी तालुक्यात सध्या कपाशीची वेचणी व साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सुरवात एकाच वेळी झाली आहे. त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवत असून, शेतक-यांना मजूर मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
बीड : आष्टी तालुक्यात सध्या कपाशीची वेचणी व साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सुरवात एकाच वेळी झाली आहे. त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवत असून, शेतक-यांना मजूर मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांवरच शेतक-यांची मदार असली तरी तालुक्यातील पांढरे सोने गोळा करत असताना लेकर मात्र काळवंडली असल्याचे दिसत आहे.
यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपासीचे क्षेत्र आहे पण झालेल्या पावसाने मोठा फटका बसला होता. सध्या उन्हाची तीव्रता जाणवत आसल्याने रानोरान कापूस मोठ्या प्रमाणात फुलत आहे. शेतातील पांढरे सोने घरात आणण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरु आहे. आपली सर्व कामे बंद ठेवून शेतक-यांचे कुटुंबच कापूस वेचणीसाठी शेतात जात आहे. सध्या शाळेला दिवाळीच्या सुटी आसल्याने मुलेही पालकाच्या मदतीला धावली आहेत. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून ग्रामीण भागात शुकशुकाट जाणवत आहे. मागील चार वषार्पासून पावसाअभावी भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी जेरीस आला होता. त्यामुळे कुठलेच उत्पन्न मिळाले नाही.
यावर्षी पावसाने दिलासा मिळाल्याने कपासीचे पीक ब-यापैकी हाती लागले आहे. त्यात अधूनमधून वातावरणातही बदल होण्यास सुरुवात झाल्याने शेतक-यांच्या चिंतेत भर पडली आहे. कपाशीची वेचणी सुरू झाल्यावर मजुरांची चणचण नित्याचीच झाल्याने आणि भावही योग्य मिळत नसल्याने शेतातील राडा बाहेर काढण्यासाठी मोठी लगबग सुरु झाली आहे. कापूस वेचणीसाठी आठ ते दहा रुपये भाव दिला जात असल्याने चिमुकले हात मोठ्या प्रमाणावर राबवताना दिसत आहे. शाळा सुरु होण्यास आठवडाभराचा अवधी असल्याने बच्चे कंपनीही शेतात कापूस वेचणीत रमली आहे.
उपाशीपोटी वेचणी
अल्पवयीन मुलांना कामाला ठेवणे किंवा काम करून घेणे कायद्याने गुन्हा आसताना देखील आष्टी तालुक्यात मात्र पैशासाठी लेकर उपाशी पोटी कापूस गोळा करताना दिसत आहेत. बालकामगार अधिका-यांनी दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कडा शहराध्यक्ष संदीप जावळे यांनी केली आहे.
बाजारभावही दोन हजार रुपयांनी कमी
मागील वर्षी कापसाला सहा हजार रुपये भाव होता.पण यंदाच्या वर्षी मात्र बाजारपेठेत हाच कापूस ४००० ते ४२०० रुपये एवढा मिळत आहे. दोन हजार रुपयांनी भाव खाली आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.