अश्लील चित्रफीत व्हायरल; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:02 AM2020-02-03T00:02:07+5:302020-02-03T00:02:58+5:30
लहान मुलांची अश्लील चित्रफीत सोशल मीडिया व मोबाईलद्वारे व्हायरल केल्याप्रकरणी पोलीस व सायबर सेलने तपासचक्र फिरवित दोघांना अटक केली आहे.
अंबाजोगाई : लहान मुलांची अश्लील चित्रफीत सोशल मीडिया व मोबाईलद्वारे व्हायरल केल्याप्रकरणी पोलीस व सायबर सेलने तपासचक्र फिरवित दोघांना अटक केली आहे. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात रविवारी हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणी तपास करण्याबाबत पोलीस उपमहानिरीक्षक बैजल यांनी बीड पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे दिलेल्या आदेशानुसार सायबर सेलच्या प्रभारी पोलीस उप निरीक्षक कोमल शिंदे व परळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस.पी.कदम यांनी तपास केला.
चित्रफीत ही परळी येथून व्हायरल झाली. त्याचा तपास करताना सोहम देवीलाल जाट याने त्याच्या मोबाईलचे सीमकार्ड त्याचा भाचा प्रकाशचंद्र जाट यास वापरण्यास दिले होते. त्यावरून त्याने अल्पवयीन मुलाची अश्लील चित्रफीत फेसबुक व मोबाईल वरून व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले. म्हणून दोघांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गु.र. नं.१३/२० कलम ६७ (क) माहिती तंत्रज्ञान कायदा व १३ (क) बाल लैंगिक अत्याचार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच आरोपींना जिल्हा व सत्र न्या. माहेश्वरी पटवारी यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले. यातील सोहम (महाराज) हा अंबाजोगाई व बीड मध्ये आचारी म्हणून काम करत असे. मोबाईलचा गैरवापर चांगलाच महागात पडल्याचे समोर आले आहे.