सकारात्मक बातमी; ५० हजार रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:54 AM2021-05-05T04:54:37+5:302021-05-05T04:54:37+5:30
बीड : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने एक सकारात्मक बातमी दिली. कोराेनाबाधितांची संख्या वाढत असली तरी आतापर्यंत ५० हजार रुग्णांनी कोरोनावर ...
बीड : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने एक सकारात्मक बातमी दिली. कोराेनाबाधितांची संख्या वाढत असली तरी आतापर्यंत ५० हजार रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. बाधित आढळले तरी घाबरून न जाता योग्य उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊ शकतो. सोमवारी नव्या १२५६ रुग्णांची भर पडली आहे. तसेच ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, १०६५ जणांनी कोरोनावर मात केली.
जिल्ह्यात रविवारी तीन हजार ७४५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी दोन हजार ४८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर १२५६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक २७९ रुग्ण आढळले. अंबाजोगाई २३७, आष्टी १०१, धारुर ६४, गेवराई ५५, केज १४३, माजलगाव ८८, परळी १२२, पाटोदा ६५, शिरुर ४७, वडवणी तालुक्यातील ५५ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, ११ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात बीड शहरातील आसेफनगरातील ७० वर्षीय पुरुष, गजानन नगरातील ६१ वर्षीय महिला, तालुक्यातील जैताळवाडी येथील ६० वर्षीय महिला, येळंबघाट येथील ४१ वर्षीय महिला, खाडेवाडी येथील ५० वर्षीय महिला, शिरुर तालुक्यातील पाडळी येथील ६२ वर्षीय महिला, जरेवाडी (ता. धारूर) येथील ५५ वर्षीय महिला, माजलगाव तालुक्यातील गुंजवाडी येथील ७० वर्षीय महिला, माळेवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, परळी तालुक्यातील सिरसाळा येथील ५८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
दरम्यान, आता एकूण रुग्णसंख्या ५८ हजार १२४ झाली आहे. पैकी ९५९ मृत्यू झाले असून, ५० हजार ६०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ही माहिती जि. प. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.
जिल्ह्यात १५२ आरोग्य संस्था
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय व खासगी अशा मिळून १५२ आरोग्य संस्था कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. येथे ११ हजार ५६६ खाटांची क्षमता असून, ११ हजार ३८० मंजूर आहेत. सध्या जिल्ह्यात ६ हजार ५५९ रुग्ण उपचाराखाली असून, ५ हजार ७ खाटा अद्यापही रिक्त आहेत.
...
कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, हे खरे आहे. परंतु, कोरोनामुक्तही होत आहेत. सध्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८७.६ टक्के एवढा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. काळजी घ्यावी. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना व नियोजन केले जात असून, लवकरच याला यश मिळेल, असा विश्वास आहे.