बीडमध्ये काका-पुतण्यात तर परळीत बहीण-भावात लढतीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 05:16 AM2019-07-17T05:16:26+5:302019-07-17T05:16:52+5:30

जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघावर भाजप-शिवसेना युतीचचे वर्चस्व आहे.

The possibility of playing in Kaka-Nut in Beed and Parathy in Sister-in-law | बीडमध्ये काका-पुतण्यात तर परळीत बहीण-भावात लढतीची शक्यता

बीडमध्ये काका-पुतण्यात तर परळीत बहीण-भावात लढतीची शक्यता

Next

- सतीश जोशी 
बीड : जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघावर भाजप-शिवसेना युतीचचे वर्चस्व आहे. आष्टी, केज, परळी, माजलगाव आणि गेवराईत सध्या तरी दुरंगी तर बीडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये सहापैकी पाच जागा भाजपने तर बीडची जागा राष्टÑवादीने जिंकली होती.
एकेकाळी काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या बीड जिल्ह्यात आता भाजपचे राज्य आहे. जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही पंकजा मुंडे यांनी माजी मंत्री सुरेश धस, रमेश आडसकर, जयदत्त क्षीरसागरांच्या मदतीने आपले बंधू विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर मात केली आहे. पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की, युतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे यांनी लोकसभा निवडणुकीत उघडउघड राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये राष्टÑवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा ६ हजार १३२ मतांनी पराभव केला होता. मेटे यांनी ही निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढविली होती. मोदी लाटेत पाच विधानसभा मतदार संघात भाजपचा विजयी रथ दौडत असताना बीडमध्ये मात्र जयदत्त क्षीरसागरांनी तो रोखून धरला होता. आता क्षीरसागर हे शिवसेनेत येऊन मंत्री झाले आहेत. त्यांच्याविरोधात त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर उतरण्याची शक्यता आहे. बीडची जागा युतीमध्ये शिवसेनेला सुटल्यामुळे मेटे यांच्यासमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. उमेदवारी मिळाली नाही तर ते तिसरा पर्याय शोधतील.
गेवराई मतदारसंघात भाजपचे आ. लक्ष्मण पवार यांनी जिल्ह्यातून सर्वाधिक ६० हजार मताधिक्क्याने शिवसेनेचे बदामराव पंडितांचा पराभव केला. ही जागा शिवसेना मागत आहे. माजलगावामध्ये राष्टÑवादीचे प्रकाश सोळंके यांचा भाजपाचे आर.टी. देशमुख यांनी जवळपास ३७ हजार मताधिक्क्याने पराभव केला होता. तिथे आता भाजपकडूनच रमेश आडसकर आणि मोहन जगताप हे इच्छुक आहेत.
केज मतदारसंघात (राखीव) भाजपच्या संगीता ठोंबरे ह्या जवळपास ४३ हजार मताधिक्क्याने विजयी झाल्या होत्या. एकेकाळी या मतदारसंघातून लागोपाठ पाचवेळा (राष्टÑवादीकडून तीन वेळा, भाजपकडून दोन वेळा) निवडून येणाऱ्या डॉ. विमल मुंदडा यांच्या स्नुषा राकाँच्या नमिता मुंदडा यांचा ठोंबरे यांनी एकतर्फी पराभव केला होता. या मतदारसंघातही राष्टÑवादीकडून माजी आ. पृथ्वीराज साठे तर भाजपकडून डॉ. अंजली घाडगे इच्छुक आहेत.
सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहीण-भावामध्ये होत आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी २०१४ च्या निवडणुकीत आपले बंधू धनंजय मुंडे यांचा जवळपास २६ हजार मताधिक्क्याने पराभव केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही परळी विधानसभेने भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना १८ हजारांचे मताधिक्क्य दिले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत हे मताधिक्क्य ७ हजारांनी घसरले आहे. या बहीण - भावातील लढत अधिक रंगतदार होईल, असे वाटत आहे.
आष्टी मतदारसंघात निवडणूक दुरंगीच होईल, असे चित्र आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आ. भीमराव धोंडे यांनी माजी मंत्री सुरेश धस यांचा जवळपास ६ हजार मताधिक्क्याने पराभव केला होता. सध्या सुरेश धस हे भाजपाकडून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. या मतदारसंघात भाजपची ताकद दुपटीने वाढली. आज राष्टÑवादी काँग्रेससमोर उमेदवार कोण द्यायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या तरी बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघावर भाजप-शिवसेनेची मजबूत पकड आहे. एका पाठोपाठ होत असलेल्या पराभवामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादी काँग्रेसची नेते मंडळी बॅकफूटवर गेली आहेत. जयदत्त क्षीरसागर यांनी राष्टÑवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे दुबळ्या होत असलेल्या शिवसेनेला या निमित्ताने नवीन ऊर्जा मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत जवळपास ९२ हजार मते बहुजन वंचित आघाडीने घेतली होती. ते कुठल्या जागा लढविणार याची चर्चा मात्र अजूनही सुरु झाली नाही.
>२०१४च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा विजय : गेवराई : लक्ष्मण पवार (भाजप) एकूण मते १,३६,३८४, फरक ६०००१. (पराभूत उमेदवार बदामराव पंडित (राष्टÑवादी काँग्रेस).
सर्वात कमी मताधिक्याने पराभव : आष्टी : सुरेश धस (राष्टÑवादी काँग्रेस) ५९८२ मतांनी पराभव, (विजयी उमेदवार : भीमराव धोंडे (भाजप)

Web Title: The possibility of playing in Kaka-Nut in Beed and Parathy in Sister-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.