कुक्कुटपक्षी गाव, वस्तीबाहेर हलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:27 AM2021-01-15T04:27:54+5:302021-01-15T04:27:54+5:30
शिरूर कासार : तालुक्याच्या शेजारी असलेल्या पाथर्डी व पाटोदा या दोन्ही तालुक्यांत बर्ड फ्लूची बाधा झाल्याचे निष्पण्ण झाल्याने ...
शिरूर कासार : तालुक्याच्या शेजारी असलेल्या पाथर्डी व पाटोदा या दोन्ही तालुक्यांत बर्ड फ्लूची बाधा झाल्याचे निष्पण्ण झाल्याने सावधगिरी म्हणून बुधवारी नगरपंचायत मुख्याधिकारी व तहसीलदारांनी फेरफटका मारला. त्याबरोबरच गाव ,वस्तीवरील कोंबड्या हलवण्यासाठी कुक्कुटपालक व व्यासायिकांना नोटिसा बजावल्या.
कोरोनापाठोपाठ सध्या बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या स्वरूपात होत आहे. त्याची झळ मानवी वस्तीला बसू नये यासाठी आता शिरूर तालुक्यातदेखील पशुवैद्यकीय दवाखान्याबरोबर नगरपंचायत व महसूल विभाग सतर्क झाला आहे. बुधवारी तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी कुक्कुट पालक व व्यावसायिकांच्या भेटी घेत दक्षतेबाबत सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत ना. त. बाळू खेडकर,तलाठी शब्बीर पठाण होते. तर नगरपंचायत प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी या संबंधित सर्व लोकांना नोटिसा बजावून आपले कुक्कुट पक्षी बाहेर हलवण्याची ताकीद लेखी स्वरूपात दिली आहे. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. शहरात कुक्कुट पक्ष्यांमुळे मानवी लोकवस्तीला संभाव्य धोका लक्षात घेऊन नोटिसा बजावल्या आहेत. अनुपालनास दिरंगाई केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल, असे प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी सांगितले.