वीजचोरी घरोघरी; दिसली फक्त ५५ दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:17 AM2019-06-24T00:17:30+5:302019-06-24T00:18:06+5:30
मागील दोन वर्षात केवळ ५५ ठिकाणी वीज चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड शहरासह जिल्ह्यात सध्या सर्वत्र सर्रास वीज चोरी केली जात आहे. महावितरणला मात्र, कोठेच ती दिसत नसल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे. मागील दोन वर्षात केवळ ५५ ठिकाणी वीज चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. यामध्ये ४६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. इतरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकीकडे वीज चोरी घरोघरी होत असताना केवळ ५५ दारीच ती आढळल्याने महावितरणकडून वीजचोरांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
वीज चोरी रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासंदर्भात महावितरणला विशेष पथके नियुक्त करून कारवाया करण्याचे आदेशही दिलेले होते. एवढेच नव्हे तर स्थानिक अभियंता, लाईनमन यांनाही वीजचोरांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आले होते. बीड जिल्ह्यात मात्र, याची कसलीच अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येत आहे.
तत्कालीन अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांनी कारवायांचा धडाका लावला होता. मात्र, सध्याचे अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या कार्यकाळात मात्र या कारवाया थंडावल्या आहेत. त्यामुळे सर्रास वीज चोरी केली जात आहे. याकडे मात्र महावितरणचे अधीक्षक अभियंता ते लाईनमनपर्यंतचे सर्वच जण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. महावितरणच्या गलथान कारभारबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. वीज चोरांना सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, महावितरणने वीजचोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दोन वर्षात काय झाल्या कारवाया ?
बीडचे अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या म्हणण्यानुसार लातुरचे पीआरओकडून माहिती घेतली.
यामध्ये त्यांनी भारतीय विद्यूत कायदा २००३ च्या कलम १२६ नुसार ५५ ठिकाणी वीज चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले. पैकी १४ प्रकरणांमध्ये रक्कम भरली असून त्यांना १ लाख ३५ हजार रूपयांचा दंड आकारला.
तसेच कलम १३५ नुसार ४६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांना ३ लाख १६ हजार रूपयांचा दंड आकारल्याचे पीआरओंनी ‘लोकमत’ला सांगितले.
अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी भ्रमणध्वनी न घेतल्याने त्यांची बाजू समजली नाही.
कोठे आणि कशी होते वीज चोरी?
ग्रामीण भागात शेतातील विद्यूत पंप, वाड्या, वस्त्यांवर सर्रासपणे वीज चोरी होते.
गावात तारेवर आकडे टाकूनी वीज चोरी केली जाते. तर शहरात नादुरूस्त मिटर, रिमोटद्वारे वीज चोरी केली जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
तसेच मिटरमध्ये किट बसवूनही वीज चोरी केली जात असल्याचे समजते.