विजेच्या तारा लोंबकळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:31 AM2021-02-07T04:31:26+5:302021-02-07T04:31:26+5:30
धारूर-आडस रस्त्याची डागडुजी सुरू धारूर : धारूर ते आडस या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ...
धारूर-आडस रस्त्याची डागडुजी सुरू
धारूर : धारूर ते आडस या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक व प्रवासी वैतागले होते. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली असून, रस्त्याची डागडुजी सुरू झाल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.
विनामास्क न फिरण्याचे आवाहन
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने, नागरिक बिनधास्त मास्क न लावताच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
स्थलांतराने रोहयोची कामे घटली
अंबाजोगाई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असलेल्या कामांना मागणी घटल्याचे चित्र आहे. सध्या शेतात मोठ्या प्रमाणात मशागतीची कामे, काढणी, मोडणी, ऊसलागवड सुरू असल्याने शेतमजुरांना शेतावरच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे, तर ग्रामीण भागातील बहुतांश मजुरांनी ऊसतोडणीसाठी कारखान्याकडे स्थलांतर केले आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या कामाची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. ऊसतोड मजुरांच्या स्थलांतरामुळे हे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
स्थानकात अस्वच्छता; आरोग्य धोक्यात
अंबाजोगाई : येथील बस स्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बस स्थानक परिसरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते, तसेच मोकाट जनावरांचा प्रादुर्भावही बस स्थानकात मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
व्यावसायिकांकडून नियमांची पायमल्ली
बीड : हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मध्यभागी दुभाजक तोडले आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे, परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गेवराई परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
गेवराई : शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे, परंतु अद्याप याकडे दुर्लक्ष होत आहे.