परळीत विजेचा लपंडाव; २४ तासात २० वेळा असते वीज गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 07:08 PM2021-08-05T19:08:57+5:302021-08-05T19:09:43+5:30
दुकानदार, वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्यांना येत आहेत अडचणी
परळी : शहरातील वाढत्या विजेचा लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत . एका दिवसात वीस वेळा वीज खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला. याप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी नगर परिषदेचे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांच्यासह भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा, महादेव ईटके,अश्विन मोगरकर, नितीन समशेटे यांनी येथील वीज वितरणाच्या परळी उपविभागाचे अतिरिक्त अभियंता प्रकाश आंबाडकर यांची गुरुवारी भेट घेवून वीजप्रश्नी निवेदन सादर केले. यावेळी गणेशपार आणि जुन्या परळी गाव भागातील सतत खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
गेल्या तीन महिन्यापासून गणेशपार भागातील संत सावता माळी मंदिर परिसर , नांदूरवेस गल्ली, जंगम गल्ली ,आंबेवेस, भिमनगर, साठे नगर, खंडोबा नगर ,किर्ती नगर, कृष्णा नगर , तुळजानगर गंगासागर नगर ,सिद्धेश्वर नगर, खुदबेनगर देशमुख गल्ली गल्ली, धोकटे गल्ली या भागात वीज पुरवठा खंडित केला जात आहे. दिवसभरात किमान २० वेळेस वीज गायब होते.असे नगरसेवक गोपाळ आंधळे ,आश्विन मोगरकर यांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान, गणेशपार विभागातच वीज गुल होण्याचे प्रमाण का वाढले या मुद्द्यावर शिक्षण सभापती गोपाळ आंधळे ,राजेंद्र ओझा ,आश्विन मोगरकर महादेव ईटके ,नितीन समशेट्टे ,रमेश चौंडे, सचिन स्वामी , हनुमान आगरकर व इतर कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
दुकानदारांची ही गैरसोय
शहरातील मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, नेहरू चौक आदी विभागातील वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने दुकानदारांनी व्यवसाय कसा करावा असा प्रश्न यावेळी नितीन समशेट्टे यांनी उपस्थित केला.
ऑनलाइन शिक्षणात अडचण
विद्यार्थ्यांचे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाल्यास विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा. तसेच काहींचे वर्क र्फॉर्म होम सुरु आहे त्यानाही अडचणी आहेत, त्यांनी काय करावे असा सवाल भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा यांनी यावेळी महावितरण अधिकाऱ्यांना विचारला.
चार महिन्यात सुरळीत होईल
शहरात असलेल्या तीन ३३ के व्ही सबस्टेशनवर भार येत आहे. लवकरच ३३ के व्ही नवीन सब स्टेशन सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या चार महिन्यात शहरातील वीज पुरवठा सुरळीत होईल
-प्रकाश आंबाडकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता