सत्तेच्या चाव्या आघाडीकडेच !

By Admin | Published: February 24, 2017 12:26 AM2017-02-24T00:26:56+5:302017-02-24T00:28:13+5:30

बीड जिल्हा परिषदेत कुठल्याचा पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस २५ जागांसह सत्तेच्या काठावर आहे.

The power of the power of the leader! | सत्तेच्या चाव्या आघाडीकडेच !

सत्तेच्या चाव्या आघाडीकडेच !

googlenewsNext

प्रताप नलावडे बीड
जिल्हा परिषदेत कुठल्याचा पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस २५ जागांसह सत्तेच्या काठावर आहे. त्यामुळे काकू- नाना आघाडीच्या तीन उमेदवारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणर आहे. काँग्रेसने ‘घड्याळ’ हातावर बांधलेच तर सत्तेचे ‘चहापान’ करण्यासाठी आघाडीच्या कपबशीचा आधार राकॉला घ्यावा लागणार आहे.
पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने जि. प. मध्ये वर्चस्व मिळवले होते. मध्यंतरी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर राकाँचे संख्याबळ घटले. अडीच वर्षांपूर्वी राकाँ व भाजपकडे समान संख्याबळ झाले. अखेर चिठ्ठीवर अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाली. यामध्ये नशीबाचा कौल राकाँ-काँग्रेसच्या बाजूने राहिला. राकाँच्या ताब्यातील जिल्हा परिषद खेचण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत सोयीनुसार आघाडी केली. इतर ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढले. दुसरीकडे सेना-भाजपनेही स्वतंत्र लढणे पसंत केले. त्यामुळे सर्वत्र तिरंगी - चौरंगी लढती झाल्या. बीडमध्ये आ. जयदत्त क्षीरसागर यांना पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काकू-नाना आघाडीच्या माध्यमातून कडवे आव्हान निर्माण केले, तर गेवराईमध्ये माजी मंत्री बदामराव पंडित यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राकाँतून बाहेर पडत ‘धनुष्यबाण’ हाती घेतला. या साऱ्या राजकीय घडामोडींचा परिणाम म्हणून कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने २५ जागा जिंकून सर्वाधिक संख्याबळ प्राप्त केले. मात्र, त्यांना सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला ३१ हा जादूई आकडा गाठता आला नाही.
दुसरीकडे राज्यात व केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपला १९ जागांवर समाधान मानावे लागले. सेनेने गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट (४) जागा पटकावल्या आहेत. माजी मंत्री बदामराव पंडित यांनी गेवराईमध्ये आपला करिष्मा दाखवून शिवसेनेच्या खात्यात या चार जागा जमा केल्या. बीडमध्ये काकू-नाना विकास आघाडीने पालिकेतील घोडदौड कायम ठेवताना तालुक्यामध्ये तीन ठिकाणी विजयाचा गुलाल लावला. आघाडीचे दोन उमेदवार अल्पशा मतांनी पराभूत झाले. विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून सुरू झालेली आ. विनायक मेटे यांची पराभवाची मालिका जि. प., पं. स. निवडणुकीत खंडित झाली. शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेने बीड तालुक्यात ३ व केज तालुक्यात १ अशा एकूण ४ जागा पटकावत ‘शिट्टी’चा आवाज केला. शिरूर कासार व आष्टी येथे २ अपक्षांनी बाजी मारून जिल्हा परिषद गाठली.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापनेच्या जवळ पोहचली आहे. मात्र, त्यांना इतरांच्या मदतीशिवाय सत्तेपर्यंत पोहचता येणार नाही. राकाँमध्ये बंडखोरी करून स्वतंत्र चूल मांडणाऱ्या संदीप क्षीरसागर यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Web Title: The power of the power of the leader!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.