सराव थांबवलेला नाही, माझे मिशन-२०२४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:32 AM2021-08-29T04:32:37+5:302021-08-29T04:32:37+5:30
आष्टी : दोन वेळा कोरोनाने जाम केले. त्यामुळे ऐन स्पर्धेच्या वेळी कामगिरी कमी पडली. पाय पळत नव्हते, त्रास होत ...
आष्टी : दोन वेळा कोरोनाने जाम केले. त्यामुळे ऐन स्पर्धेच्या वेळी कामगिरी कमी पडली. पाय पळत नव्हते, त्रास होत होता; पण जिंकायच्या अपेक्षेने धावत होतो. कोरोनाने मागे खेचले. मी माझ्या खेळाचा सराव आणखी थांबवलेला नाही. २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्यासाठी मी रात्रं-दिवस सराव करत असल्याचे सांगत ऑलिम्पिक खेळाडू अविनाश मुकूंद साबळे याने आपले मिशन स्पष्ट केले.
तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयांत सत्कारप्रसंगी तो बोलत होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी.आ.भीमसेन धोंडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा भाजपाचे सरचिटणीस शंकर देशमुख, अविनाश साबळेंचे वडील मुकुंद साबळे होते.
या कार्यक्रमात अविनाश साबळे यांचा शाल, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम पंचवीस हजार रुपये व फेटा बांधून मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी. आ.भीमसेन धोंडे म्हणाले की, आष्टी तालुक्यातील मांडवा बेलगावसारख्या खेड्यात जन्म घेऊन अविनाश साबळे याने ऑलिम्पिक स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये सातवा क्रमांक मिळवला. ही मोठी कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे. टोकियो येथील स्पर्धेत साबळेना मेडल मिळाले नाही, तरी २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत नक्कीच मेडल मिळेल, अशी अपेक्षा धोंडे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ.बा. आं. मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य तथा प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी केले. कडा आष्टी परिसरात असे गुणी खेळाडू घडावे तसेच अविनाश साबळेचे कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी शंकर देशमुख यांनी भाषण केले. प्रा.भास्कर चव्हाण यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा.डॉ.बी.एस. खैरे यांनी तर प्रा.डॉ.मुस्ताक पानसरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा.डॉ.सय्यद जमिर, मुकूंद साबळे, प्राध्यापक, क्रीडाप्रेमी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेळाचा तास करमणुकीसाठी नसावा
आजच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये खेळाला दुय्यम दर्जा न देता प्रोत्साहन दिले तर ग्रामीण भागातील अनेक खेळाडू तयार होतील. आज शाळेमध्ये खेळाचा तास म्हणजे करमणूक करण्यासाठी असतो, खेळाकडे गंभीर दृष्टीने पाहिले जात नाही. जर वैयक्तिक खेळाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिले तर ऑलिम्पिकचे एक काय अनेक पदके आपल्या देशाला मिळू शकतील, असे सत्काराला उत्तर देताना अविनाश साबळे म्हणाला.
280821\img-20210828-wa0568_14.jpg