आष्टी तालुक्यात वाळू अभावी प्रधानमंत्री आवास योजेनेची कामे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:29 AM2020-12-24T04:29:06+5:302020-12-24T04:29:06+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकूल मंजूर लाभार्थ्यांना घरकुलाची कामे पूर्ण करण्यासाठी देय असलेल्या रकमेत घराचे बांधकाम करणे खूप अवघड झाले ...
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकूल मंजूर लाभार्थ्यांना घरकुलाची कामे पूर्ण करण्यासाठी देय असलेल्या रकमेत घराचे बांधकाम करणे खूप अवघड झाले आहे. घरांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे वाळूअभावी घरकुलाची कामे ठप्प झाली आहेत. लाभार्थ्यांनी सदरील कामांसाठी मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली होती. त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना तसे निर्देश दिले होते. तरी आज तागायत या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने वाळू अभावी घरकुलांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्वरित या प्रश्नाकडे लक्ष घालून मार्गी लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी केली आहे. एक ब्रास वाळू साडेचार हजारात
सध्या तालुक्यात एकाही ठिकाणी वाळू घाटाचे लिलाव गेल्या पाच वर्षापासून झाले नाहीत. तरीही मोठ्या प्रमाणात महसूल विभागाला चुना लावून शहरात व तालुक्यात सर्रास वाळू उपसा करत आहेत. नागरिकांचे कंबरडे मोडून एक ब्रास वाळू साडेचार हजार रुपयाला विकत आहेत. याकडे मात्र,महसूल प्रशासनाला लक्ष देण्यास वेळ नाही का? अशी चर्चा सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकूल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू देण्याचा आदेश आहे. परंतु ज्या तालुक्यात वाळूचे लिलाव झाले आहेत, अशा ठिकाणी मोफत देता येत असल्याचे प्रभारी तहसीलदार शारदा दळवी यांनी लोकमतला सांगितले.