प्रकल्प प्रेरणातील घोटाळा; चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती, दोन दिवसांत अहवाल देण्याचे सीएसचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 05:10 PM2021-09-15T17:10:15+5:302021-09-15T17:13:08+5:30
Prakalp Prerana scam in Beed Civil Hospital : प्रकल्प प्रेरणा विभागाचे नोडल ऑफिसर डॉ.सुदाम माेगले यांनी न वापरलेल्या आणि खाजगी व्यक्तीच्या वाहनावर १४ लाख रूपये बील काढल्याची बाब लोकमतने १२ सप्टेंबर रोजी चव्हाट्यावर आणली होती.
- सोमनाथ खताळ
बीड : जिल्हा रूग्णालयातील ( Beed Civil Hospital ) प्रकल्प प्रेरणा विभागातील १४ लाखांचा घोटाळा 'लोकमत'ने पुराव्यानिशी चव्हाट्यावर आणला होता. याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. चौकशी करून दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश डॉ.साबळे यांनी दिले आहेत. आता घोटाळेबाजांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ( Prakalp Prerana scam in Beed; Three-member committee for inquiry, CS orders to report within two days)
प्रकल्प प्रेरणा विभागाचे नोडल ऑफिसर डॉ.सुदाम माेगले यांनी न वापरलेल्या आणि खाजगी व्यक्तीच्या वाहनावर १४ लाख रूपये बील काढल्याची बाब लोकमतने १२ सप्टेंबर रोजी चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर याप्रकरणात आणखी खोलवर जावून माहिती घेतली असता प्रत्यक्षात वापरलेले वाहन हे १४ वर्षांपूर्वीचे आहे. नियमानुसार शासकीय वाहन ५ वर्षांपेक्षा जुने असू नये असा नियम आहे. परंतू एनएचएमचे लेखापाल संतोष चक्रे आणि डॉ.मोगले या दोघांनी मिळून शासनाची फसवणूक करत लाखो रूपयांचे बिले काढल्याचे उघड झाले होते. हा सर्व प्रकार लोकमतने चव्हाट्यावर आणताच जिल्हा शल्य चिकित्सकांनी याची गंभीर दखल घेत बुधवारी चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियूक्त केली. दोन दिवसांत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश डॉ.साबळे यांनी दिले आहेत. आता यात डॉ.मोगले यांच्यासह आणखी किती लोकांचा सहभाग आहे, हे चौकशीनंतरच समोर येणार आहे.
हेही वाचा - बीडमधील प्रकल्प प्रेरणा घोटाळा; डॉ. मोगलेसह मते, कदम ‘मास्टर माईंड’
मैत्रि निभावणार की निपक्ष चौकशी होणार?
चौकशीसाठी नियूक्त केलेल्या समितीतील दोन अधिकारी हे डॉ.मोगले यांच खास मित्र आहेत. आता त्यांच्याकडूनच चौकशी होणार असल्याने चौकशी निपक्ष होते की मित्राला बगल दिली जाते, हे दोन दिवसानंतर समजणार आहे. केवळ कागद काळे करून अहवाल देण्याचा प्रयत्न केल्यास समितीचीच चौकशी लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 'लोकमत'कडून याचा पाठपुरावा केला जाणार आहे.
अहवालानंतर योग्य ती कारवाई
प्रकल्प प्रेरणा विभागातील प्रकार समजला आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियूक्त केली आहे. दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. अहवाल मिळाल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड
हेही वाचा - 'अधिकाऱ्यांच्या मनमानीपणाचे उदाहरण',औरंगाबाद खंडपीठाकडून महावितरणला ५ लाख रुपये ‘कॉस्ट’