बीडमधील प्रकल्प प्रेरणा घोटाळा; डॉ. मोगलेसह मते, कदम ‘मास्टर माईंड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 14:32 IST2021-09-13T14:29:54+5:302021-09-13T14:32:13+5:30
Beed Civil Hospital : शेतकरी आत्महत्या रोखण्याऐवजी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार जिल्हा रूग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभाग करत आहे.

बीडमधील प्रकल्प प्रेरणा घोटाळा; डॉ. मोगलेसह मते, कदम ‘मास्टर माईंड’
- सोमनाथ खताळ
बीड : जिल्हा रूग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागातील १४ लाखांच्या घोटाळ्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ.सुदाम मोगलेसह अशोक मते व महेश कदम या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. मतेंनी यादी तयार केली, मोगलेंनी सह्या केल्या तर कदमने बीले काढल्याचे सूत्रांनी सांगितले. हे तिघेच या प्रकरणात मास्टरमाईंड असल्याची चर्चा आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्याऐवजी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार जिल्हा रूग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभाग करत आहे. भेटी, मार्गदर्शनाच्या नावाखाली १४ लाख रूपयांची उधळपट्टी करण्यात आली. विशेष म्हणजे हे सर्व बिले अनोळखी माणसाच्या वाहन क्रमांकावर उचलण्यात आली. हा क्रमांक प्रकल्प प्रेरणा विभागातील अशोक मते यांनीच टाकल्याचे समोर आले आहे. तसेच डॉ.मोगले हे देखील कागदी घोडे नाचविण्यात माहिर आहेत. त्यांनीही आलेल्या क्रमांकावर स्वाक्षऱ्या केल्या. महेश कदम यांनीही याचे सर्व बिले काढले. हे तिघेही या घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणाही दिवसेंदिवस वाढत आहे. याबद्दलही तक्रारी वाढल्या आहेत.
एनएचएम विभागात टक्केवारी
या घोटाळ्यात या तिघांसह राष्ट्रीय आरोग्य अभियानातील लेखापाल, जिल्हा समन्वय अधिकारी व कंत्राटदारही सहभागी आहे. सर्वांनी मिळून हा घोटाळा केल्याचे सांगण्यात येत आहे.
फसवणूकीचा गुन्हा दाखल होणार
डॉ.मोगले यांच्यासह मते, कदम व राष्ट्रीय आराेग्य अभियानातील कर्मचाऱ्यांसह कंत्राटदारावर फसवणूकीचा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत वकिलांचे मार्गदर्शन घेण्यात आले असून पोलीस अधीक्षकांशीही संपर्क साधणे सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.